पुणे: एसटीच्या अधिकार्‍याला चार एजंटांकडून शिवीगाळ | पुढारी

पुणे: एसटीच्या अधिकार्‍याला चार एजंटांकडून शिवीगाळ

पुणे: खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या एजंटापासून सावध राहा, अशा सूचना प्रवाशांना देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी नियंत्रकाला चार एजंटांनी शिवीगाळ करून धमकाविले. या चौघा एजंटांविरोधात सरकारी कर्मचार्‍याला धमकावले तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर नागटिळक, विशाल राठी, पवार आणि कुमार निकंब अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात स्वारगेट एसटी स्थानकावरील प्रवासी नियंत्रक नामदेव बाळासाहेब कारले (वय 52, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वारगेट स्थानकात घडला. स्वारगेट एसटी स्थानकात येणार्‍या प्रवाशांना खिसेकापू, बॅग उचलणार्‍यांपासून सावध राहा, आपले मोबाईल, लॅपटॉप व मौल्यवान वस्तू सांभाळा, अशा सूचना माईकवरून देण्याचे काम प्रवासी नियंत्रक कारले करतात. दिवाळीनिमित्त स्वारगेट एसटी स्थानकात पुण्याबाहेर जाणार्‍या प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

एजंटांच्या मक्तेदारीला रोखणार कोण?

एसटीच्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारात खासगी वाहतूकदारांच्या एजंटांनी अक्षरशः थैमान घातले आहे. एसटीचे प्रवासी पळवून एसटीच्याच अधिकार्‍यांना दादागिरी केली जात आहे. वर दिवाळी सणाला तर अवाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूटमार सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा एजंटांच्या मक्तेदारीसह दादागिरीला रोखणार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Back to top button