कोल्हापूर : मेंढोलीत मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : मेंढोलीत मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू

आजरा : पुढारी वृत्तसेवा; मेंढोली (ता. आजरा) येथे शेळ्या चारण्यासाठी शेताकडे गेलेल्या वृद्ध शेतकर्‍याचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला. नानू जोतिबा कोकीतकर (वय ८०) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. तर मधमाश्यांच्या हल्ल्यात सहा शेळ्याही जखमी झाल्या आहेत. ही घटना आज (दि.२२) सकाळी उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी, गावाशेजारील काळवाट नावाच्या शेतात कोकितकर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे आजऱ्याचा शुक्रवारी आठवडा बाजारादिवशी ते घरी न येता शेतातच थांबत होते. शनिवारी सकाळी घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. ते शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. शेळ्याही मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोकितकर यांचा एक मुलगा केंद्रीय राखीव पोलीस दलात तर दुसरा शेतकरी आहे. ऐन दिवाळीत कोकीतकर यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button