राज्यात ऑक्टोबरमध्ये पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके अडचणीत | पुढारी

राज्यात ऑक्टोबरमध्ये पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके अडचणीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात मुसळधार पावसाच्या धुमशानमुळे खरिपाच्या पिकांचे दिवसागणिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात गेल्याने दिवाळी सणापूर्वीच चिंतातुर झालेल्या शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. ऑक्टोबर महिन्यात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, भाजीपाला पिकांसह फळबागांचीही मोठी हानी झाल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे पिकांच्या नुकसानीबाबतचा 18 जिल्ह्यांतील अहवाल कृषी आयुक्तालयास प्राप्त झालेला आहे.

अद्याप ठाणे, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, धुळे, उस्मानाबाद, वर्धा या आठ जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीचे अहवाल मिळणे बाकी आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यात अतिवृष्टी, वादळी वार्‍यामुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा जिल्हानिहाय हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. रायगडमध्ये 75 हेक्टर, सिंधुदुर्गमध्ये 60, रत्नागिरी 4, जळगाव 134, नाशिक 433, अहमदनगर 46 हजार 30, पुणे 8 हजार 145, सोलापूर 23 हजार 699, सातारा 1129, सांगली 4280, कोल्हापूर 995, वाशिम 3123, अकोला 44 हजार 180, अमरावती 15 हजार 810, बुलडाणा 12 हजार 62, यवतमाळ 12 हजार 317, नागपूर 60, गोंदिया 772 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात 8 हजार 145 हेक्टरवरील पिके बाधित
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातील सततच्या पावसामुळे भात, बाजरी, सोयाबीन, भाजीपाला व फळपिकांचे मिळून सुमारे 8 हजार 145 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यामुळे भोर, मावळ, हवेली, शिरूर, पुरंदर तालुक्यातील क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे 240 हेक्टरवरील शेतजमिनीचे नुकसान झाल्याचेही कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button