UK PM Truss Resigns : ब्रिटनच्या राजकारणात भूकंप! पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा | पुढारी

UK PM Truss Resigns : ब्रिटनच्या राजकारणात भूकंप! पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या राजकारणात भूकंप झाला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या केवळ ४५ दिवस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहिल्या. ब्रिटनचे नवे पंतप्रधान होईपर्यंत त्या आपल्या पदावर राहतील. (Liz Truss resigns as UK Prime Minister)

लिझ ट्रस पंतप्रधानपदावरून पायउतार होतील अशी शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. अखेर ट्रस यांनी आज राजीनामा देऊन या प्रकराणाला पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेत्या लिझ ट्रस यांनी आपले प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांचा पराभव करून ब्रिटनच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्या होत्या. पण त्यांचा कार्यकाळ खूपच कमी ठरला.

राजीनाम्यानंतर लिझ ट्रस म्हणाल्या…

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर लिझ ट्रस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती पाहता, ज्या आश्वासनांसाठी मी निवडणूक लढवली ती मी पूर्ण करू शकत नाही, असे मला वाटते. मी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. जेव्हा मी युकेची पंतप्रधान झाले तेव्हा आर्थिक स्थैर्य नव्हते. आम्ही कर कमी करण्याचे स्वप्न पाहिले. मी मजबूत अर्थव्यवस्था भक्कम करण्याचाही प्रयत्न केला. पण तो मी पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

‘मिनी बजेट’ पडले महागात

ब्रिटनच्या संसदेत लिझ ट्रस सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी करवाढ आणि महागाई रोखण्यासाठी पावले उचलली. मात्र, लवकरच हे निर्णय सरकारने मागे घेतले. लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा जनतेला महागाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणता येईल, अशी आशाही जनतेला होती.

निवडणुकीत ट्रस यांनी जनतेला अनेक लोकोपयोगी आश्वासने दिली होती. या आश्वासनांच्या जोरावर त्यांना सत्तेचे सिंहासन मिळाले. ट्रस यांनी जनतेला कर कपातीचे आश्वासन दिले होते. ट्रस सत्तेवर आल्यानंतर त्यांनी करात कपात केली पण नंतर त्यांनी दिलेले वचन मोडले. कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर पक्षांतर्गत बंडखोरी सुरू झाली.

ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर इन्फोसीस कंपनीचे संस्थापक नायारण मुर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याची ‘सुवर्ण संधी’ चालून आली आहे. ट्रस यांनी गुरुवारी डाऊनिंग स्ट्रीट येथे बैठक घेतली. बैठकीदरम्यान, 13 टोरी खासदारांनी उघडपणे ट्रस यांना राजीनामा देण्यास सांगितले.

Back to top button