पिंपरी : महिला मृतदेहाच्या अदलाबदली प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून चौकशी समितीची स्थापना | पुढारी

पिंपरी : महिला मृतदेहाच्या अदलाबदली प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून चौकशी समितीची स्थापना

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दोन महिला मृतदेहाच्या अदलाबदलीचा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समिती 7 दिवसांत अहवाल सादर करेल. त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.19) सांगितले.

वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या थेरगाव येथील रहिवाशी असलेल्या महिलेचा मृतदेह दापोडी येथील रहिवाशी असलेल्या महिलेच्या नातेवाइकांना देण्यात आला. त्यांनी मृतदेहावर थेरगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या संदर्भात आयुक्त बोलत होते. ते म्हणाले की, पालिका व पोलिसांचे अधिकार्‍यांनी वायसीएमच्या पोस्टमार्टम विभागास भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. सविस्तर चौकशी करून येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या कार्यशैलीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांना यापूर्वी तसेच, आजही सक्त ताकीद दिली आहे. रुग्णालयांची इमारत, पोस्टमार्टम विभाग, नर्सिंग महाविद्यालय व इतर सेवा व सुविधा वाढविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याबाबत प्रशासन गांभीर्याने पावले उचलत आहे.

यंत्रणेतील त्रुटी दूर करू

शवविच्छेदन ही बाब रुग्णालय व पोलिस दोन्ही विभागाची संबंधित आहे. नातेवाइकांशी चर्चा करून प्राथमिक माहिती घेतली आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

डॉक्टरसह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

महिलांचे मृतदेह अदलाबदली प्रकरणी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात काम करणारे डॉक्टर, कर्मचारी तसेच इतर संबंधित यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन अशोक गायकवाड (31, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी रोहन गायकवाड यांची आई स्नेहलता अशोक गायकवाड (61) यांचा मृत्यू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तेथील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच, कायदेशीर काम न केल्याने मृतदेहांची बदलाबदली झाली. संबंधित डॉक्टरांचा व कर्मचारी यांचा हलगर्जीपणा व कायदेशीर काम न केल्याने फिर्यादीच्या आईच्या मृतदेहाची अवहेलना झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button