चंद्रपूर : नागभिड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात १ ठार; एकजण गंभीर जखमी | पुढारी

चंद्रपूर : नागभिड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात १ ठार; एकजण गंभीर जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वाघाच्या हल्ल्यात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागभिड तालुक्यातील पान्होळी व चिखलगाव येथे या घटना सोमवारी आणि मंगळवारी घडल्या. सत्यभान मेश्राम असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तर भाऊराव तुकाराम गेडाम (वय 65) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून तो चिखलगाव येथील रहिवासी आहे. दोन्ही घटना नागभिड तालुक्यातच घडल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि.१७) सत्यभान मेश्राम हा म स्वतःच्या शेळ्या घेऊन जंगलामध्ये चारण्यासाठी गेला होता. मसली बिटातील कंपार्टमेंट नंबर 669 मध्ये दुपारी 1 पर्यंत शेळ्या चारत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरतात नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागभीड वन विभागाचे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृत गुराख्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. नागभिड वनविभागाने तातडीने त्याच्या पत्नीला 25 हजारांची आर्थिक मदत केली आहे.

दुसरी घटना नागभीड तालुक्यातील आलेवाही बिटांतर्गत चिखलगाव येथील नदीकिनारी असलेल्या शेतशिवारात घडली. आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. भाऊराव तुकाराम गेडाम (वय 65) असे शेतकऱ्याचे नाव असून तो चिखलगाव येथील रहिवासी आहे. भाऊराव गेडाम हे नदीकिनारी असलेल्या शेतशिवारात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button