पाडळी दर्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ | पुढारी

पाडळी दर्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

निघोज : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी व वासरू ठार झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पाडळी दर्या येथील आगर मळ्यात जनावरे चारायला गेलेले तरुण शेतकरी सुरेश भगवान गुंजाळ यांच्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार मारले होते. त्याचा पंचनामा पूर्ण होत नाही, तोच तिकोणे दरा परिसरात एकनाथ बाळू तिकोणे यांच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक शेळी मारली. त्यामुळे पाळीव जनावरांना चारायला कुठे न्यायचे, हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

बिबट्याला रान मोकळे असून, गुरे राखणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. जनावरांनंतर माणसांवरही बिबट्याच्या हल्ल्याचा धोका आहे. पाडळी दर्या गावात झाडी, झुडपे, ओढे, नाले आणि पाणवठे आहेत. त्यामुळे या परिसरात बिबटे, हरणे, रानडुकरे, लांडगे, कोल्हे, तरस, ससे, मोर असे प्राणी, पशू, पक्षी वास्तव्यास आहेत. वनविभागाने पाडळी दर्या परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी युवा नेते अशोक कोंडीभाऊ खोसे यांनी वनमंत्र्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Back to top button