कर्जत : न्यायालयाची स्थगिती उठल्याने आतषबाजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

कर्जत : न्यायालयाची स्थगिती उठल्याने आतषबाजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जतमधील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयास दिलेली स्थगिती राज्य सरकारने उठवताच, राष्ट्रवादी काँग्रेसने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडीत पेढे वाटून जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश शिंदे, गटनेते संतोष मेहत्रे, उपगट नेते सतीश पाटील, नगरसेवक लालासाहेब शेळके, ओंकार तोटे, भाऊसाहेब तोरडम’ल, रवींद्र सुपेकर, नामदेव थोरात, बबन नेवसे, इकबाल काजी, राहुल नवले यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कर्जतमध्ये सीनियर डिव्हिजन न्यायालय व्हावे यासाठी आ.रोहित पवार यांनी पाठपुरावा केल्याने मविआ सरकारच्या काळात त्यास मंजुरी मिळाली. शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती दिली. ही स्थगिती उठावी यासाठी आ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. अधिकारी स्तरावरही पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.
                                                                – सुनील शेलार

सीनिअर डिव्हिजन न्यायालयाला मिळालेली स्थगिती उठविल्याने पक्षकारांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत होणार आहे. कर्जतचे सिनिअर डिव्हिजन न्यायालयाचा प्रश्न 15 वर्षांपासून प्रलंबित होता.आ. पवारांच्या पाठपुराव्याने तो सुटला. वकिलबांधवांनीही फटाके फोडत आनंदोत्सव व्यक्त केला.
                                                                 – अ‍ॅड. सुरेश शिंदे

आ. पवार यांचा पाठपुरावा व प्रयत्नामुळेच कर्जतला वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय मंजूर झाले. कर्जतसोबतच शेजारच्या तालुक्यातील दावेही येथे निकाली निघतील. कर्जत तालुक्यातील पक्षकार आणि वकिलांना श्रीगोंदा येथे जावे लागत होते. तो हेलपाटा, वेळ, खर्च वाचणार आहे.
                                                   – नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष

कर्जत वरिष्ठ न्यायालयाची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी आ. पवार यांच्यामुळे पूर्ण झाली. फटाके फोडून पेढे वाटत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मविआ घटक पक्षाने जल्लोष केला.
                                                        – विशाल मेहेत्रे

Back to top button