पिंपरी : …आणि आरोग्यमंत्री धावून आले तरुणाच्या मदतीला | पुढारी

पिंपरी : ...आणि आरोग्यमंत्री धावून आले तरुणाच्या मदतीला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी सक्रियपणे काम करणारा तरुण तानाजी भोसले गंभीर अपघातामुळे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याचे कळल्यानंतर शनिवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात धाव घेतली. तसेच, भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना मानसिक आधार दिला.
तसेच, तानाजीवर उपचारासाठी लागणार्‍या खर्चाबाबत चिंता न करता मी सर्व जबाबदारी घेतो, असा विश्वास दिला.

या वेळी रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांशी त्यांनी तानाजीच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. रुग्णालयात उपचार घेत असलेले इतर रुग्ण व नातेवाइकांशीदेखील आरोग्यमंर्त्यांनी संवाद साधला. दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. सावंत म्हणाले की, ‘तरुण मित्रांनी प्रवास करताना हेल्मेट, सीट बेल्ट वापरावे. वाहन काळजीपूर्वक चालवावे. वाहतुकीचे सर्व नियम पाळावे. वाहतुकीचे नियम स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

Back to top button