नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली | पुढारी

नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा

नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास नांदुरनाक्याजवळ बसच्या भीषण अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यात अपघातग्रस्त बसही पूर्ण जळून खाक झाली. ही घटना ताजी असतानाच सप्तशृंगीगडावर आणखी एका एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. प्रवाशांनी बसमधून वेळीच उड्या मारल्याने जीवीतहानी टळली.

आज सप्तशृंगीच्या घाटात गावापासून दीड कि.मी अंतरावर असलेल्या ठिकाणी नांदुरी ते सप्तशृंगगडावर येणा-या बस मध्ये काही बिघाड झाल्याने बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे सर्वञ धावपळ उडाली. प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बसच्या खिडक्यांमधून उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली.

पिंपळगाव बसवंत डेपो ची ही बस होती. (क्र, एमएच 14 बी टी 3752) च्या या बस मध्ये तब्बल 40 ते 50 प्रवाशी होते. गेर बाॅक्स मध्ये शाॅटसॅकीट झाल्याने या बसने पेट घेतला. अनेक बसेस या जुन्या झाल्या असून या बसेसची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत दोन दिवसापूर्वीच दै. पुढारी ने बसेस संबधी असलेल्या अडचणींसंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. अशा दुर्घटना टाळण्यासाठी याप्रश्नाकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सातव्या माळेला देखील भाविकभक्तांना एस टी महामंडळाच्या बसेसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्याचवेळी एस. टी महामंडळाने दखल घेणे गरजेचे होते. उद्या कोजागिरी पौर्णिमा असल्याने मोठ्या प्रमाणावर कावडीधारक व भाविक महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथून येत असतात. त्यात आज अशी दुर्घटना घडल्याने भाविक चिंतेत पडले आहेत.

Back to top button