पुणे : ग्राहक आयोगाचा मध्य रेल्वेला दणका | पुढारी

पुणे : ग्राहक आयोगाचा मध्य रेल्वेला दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाच्या चोरीला गेलेल्या वस्तू शोधण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या मध्य रेल्वेला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांचे 5 लाख 12 हजार 700 रुपये 27 डिसेंबर 2019 पासून वार्षिक 6 टक्के व्याजाने देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला. याबाबत येरवडा परिसरातील वडगाव शेरी भागातील रहिवासी महिलेने अ‍ॅड. अर्धापुरे यांच्यामार्फत स्टेशन इनचार्ज, मध्य रेल्वे, मनमाड आणि दि डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांच्या विरुद्ध अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार त्यांच्या मुलासह 26 नोव्हेंबर 2017 रोजी रेल्वेने एसी टु-टीअरमधून मथुरा ते अल्नावर असा प्रवास करीत होत्या. त्या दोघांना बर्थ क्रमांक 5 आणि 6 देण्यात आला होता. 27 नोव्हेंबर रोजी रेल्वे मनमाड येथे आली असता दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. त्यातील एकाने त्याचे पैसे सीटखाली पडल्याची बतावणी केली. तक्रारदारांनी खातरजमा करण्यासाठी सीटखाली पाहत असताना दुसर्‍या व्यक्तीने तक्रारदारांच्या सीटवर त्यांनी ठेवलेली पर्स पळवली.

तक्रारदारांनी 27 डिसेंबर 2017 रोजी मनमाड रेल्वे पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यामध्ये घड्याळ, कानातील रिंग यासह अन्य असा मिळून 5 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद केले. 6 जून 2018 रोजी मनमाड रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास लागत नसल्याने तक्रार बंद करत असल्याचे सांगितले. आरक्षित कक्षांमध्ये प्रवास करताना ही घटना घडली. आरक्षित कक्षांमध्ये त्रयस्त व्यक्ती न येण्याची काळजी घेणे, हे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे.

त्यामुळे रेल्वेने भरपाई द्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली. वारंवार विनंती करूनही रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेत 5 लाख 12 हजार 700 रुपये 18 टक्के व्याजाने परत देण्याची मागणी केली. रेल्वेला संधी देऊनही आयोगात हजर न झाल्याने त्यांच्या विरुद्ध आदेश पारीत करण्यात आला. हे प्रकरण 24 सप्टेंबर 2021 रोजी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वर्ग करण्यात आले.

Back to top button