करंजी : डोंगरातील पाणी थेट कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावर | पुढारी

करंजी : डोंगरातील पाणी थेट कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावर

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील जांब-कौडगावजवळ डोंगरातून वाहून येणारे पाणी थेट कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरून वाहत आहे. त्यामुळे डांबरी रस्ता खराब झाला असून, रस्त्याचा काही भाग पाण्याच्या वेगाने अक्षरशा तुटून गेला आहे. ठेकेदाराकडून करण्यात येत असलेल्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांची डोळेझाक होत आहे. डोंगरातून वाहून येणारे पाणी काढून देण्याची व्यवस्था ठेकेदाराणे न केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावरून वाहत आहे. दोन दिवसांपूर्वी मराठवाडी, जांब कौडगाव या भागात जोरदार पाऊस झाला.

मराठवाडी जवळ देखील ठेकेदाराने डोंगरातून वाहून येणारे पाणी चर खोदून अथवा साईड गटाराच्या माध्यमातून काढून देण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे डोंगरातून वाहून येणारे पाणी थेट महामार्गावर येत असल्याने परिसरातील रस्ता दोन महिन्यांत खराब झाला आहे. पाण्याच्या वेगाने रस्त्याचा काही भाग देखील वाहून गेला आहे. महामार्गावरील पाण्यामुळे वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याबरोबरच डोंगरातील दगड, माती देखील रस्त्यावर येत असून मोटरसायकल स्वारांचा यामुळे अपघात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाचे काम रखडल्यामुळे ठेकेदार थातूरमातूर पद्धतीने उर्वरित काम उरकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित अधिकारी देखील या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत की काय असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

Back to top button