पुणे शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

पुणे शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, शिवाजीनगर आणि विश्रांतवाडी परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद झाला. यामुळे नागरिकांना अघोषित पाणीकपातीचा सामना करावा लागला. पाणीपुरवठा करणार्‍या जलकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि उच्च दाब वीज वाहिनीत बिघाड झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, डेक्कन व शिवाजीनगरच्या काही भागांतील नागरिकांना गुरुवारी पाणीपुरवठा झाला नाही.

त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून माजी नगरसेवक, महापालिकेचे कर्मचारी, अधिकार्‍यांना फोन करण्यास सुरुवात केली. काही सोसायट्यांमध्ये टँकरदेखील मागवावे लागले. अनेक नागरिकांनी या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, महापालिकेच्या ‘पीएमसी केअर’ सेवेतर्फे केवळ पुढील कार्यवाहीसाठी आपला पत्ता कळवावा, या स्वयंचलित (बॉट) उत्तरापलीकडे काहीही उत्तर दिले गेले नाही. पाणीपुरवठा कशामुळे खंडित झाला व तो कधी सुरू होईल, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाली नाही. काही माजी नगरसेवकांनी या संदर्भात मेसेज व्हायरल करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे हरिगंगा टाकीवर अवलंबून असलेल्या विश्रांतवाडी परिसराला फटका बसला. प्रतीकनगर, मोहनवाडी, पंचशीलनगर, कस्तुरबा सोसायटी या भागात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या परिसरात रात्री आठ ते दहा या वेळेत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले. तर दुपारी तीन ते रात्री नऊपर्यंत फुलेनगर, इंदिरानगर, शांतीनगर, भारतनगर, कत्तरवाडी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला.

वारजे पंपिंग केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर उच्च दाब वीज वाहिनीत बिघाड झाल्याने पंपिंग केंद्र बंद राहिले. दुरुस्ती झाल्यानंतर पंपिंग सुरू करून संबंधित भागाला अतिरिक्त वेळ पाणीपुरवठा करण्यात आला, असे पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button