नगर: हुमणीग्रस्त उसाला चौदाशे रुपये भाव, साखर कारखान्यांनी वेळेत गाळप हंगाम सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी | पुढारी

नगर: हुमणीग्रस्त उसाला चौदाशे रुपये भाव, साखर कारखान्यांनी वेळेत गाळप हंगाम सुरू करण्याची शेतकर्‍यांची मागणी

भेंडा, पुढारी वृत्तसेवा: हुमणी अळीचा वेळेत बंदोबस्त न केल्यामुळे सध्या आडसाली व खोडवा उसाचा मोठ्या प्रमाणात हुमणी अळीने फडशा पाडला आहे. त्यामुळे या उसास 1 हजार 200 ते 1 हजार 400 रुपये प्रतिटन चार्‍यासाठी भाव मिळत असल्याने साखर कारखाने वेळेत सुरू होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळावे,अशी अपेक्षा ऊस उत्पादाकांतून व्यक्त होत आहे.

दरवर्षी जूनच्या सुरुवातीस हुमणी अळीचे भुंगे शेतात अंडी घालतात. याच कालावधीत जर शेतकर्‍यांनी कृषी खात्याच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना केली तर हुमणी अळी तयारच होणार नाही. परंतु बहुतेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नंतर हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर कितीही उपाययोजना केली, औषधासाठी मोठा खर्च केला, तरी त्यास फारसा अटकाव होत नाही. पर्यायने अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च केलेल्या ऊस पिकाचे नुकसान होते व अल्प दराने विकण्याची वेळ येते. उसास एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च करूनही शेवटी पंधरा ते वीस हजार रुपये पदरात पाडून घेण्याची नामुष्की त्यामुळे शेतकर्‍यावर येते. एकच हुमणीची अळी 8 ते 10 ऊसाचे बेट मुळासकट उखडून टाकते. त्यामुळे 3-4 दिवसांत ऊस वाळण्यास सुरुवात होते. असे हळूहळू पूर्ण ऊसाचे क्षेत्र हुमणीस बळी पडते.

राज्य सरकारने 15 ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू होतील अशी घोषणा केलेली आहे . ऊसास दरही 3 हजारांपेक्षा जास्त जाहीर केला आहे. परंतु सध्या हुमणीमुळे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने कारखाने किमान 15 ऑक्टोबरला तरी वेळेत सुरू व्हावेत,अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी वर्गांमधून होत आहे. हुमणी अळीचा एकत्रितपणे बंदोबस्त साखर कारखान्यांनी करण्याबाबत काही पथदर्शक प्रकल्प उभारल्यास नक्कीच हुमणीस आळा बसू शकेल. परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. हुमणीग्रस्त उसाचे क्षेत्र चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणात नाविलाजाने देऊन आर्थिक नुकसान सोसावे लागते.

दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अ‍ॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते. जमिनीतून फोरेट (10 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.3 टका दाणेदार) 25 किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावे. क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 25 ते 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Back to top button