निर्भय उपचारांमुळे आयुर्वेदाचे वर्चस्व अबाधित : पद्मश्री देवेंद्र त्रिगुणा | पुढारी

निर्भय उपचारांमुळे आयुर्वेदाचे वर्चस्व अबाधित : पद्मश्री देवेंद्र त्रिगुणा

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  आयुर्वेद उपचार जीवनाचे शास्त्र आहे. आयुर्वेदाला जीवन यात्रा संबोधले जाते. जगातील इतर सर्व उपचार पद्धतींचे बाह्य व अनिष्ट परिणाम होत असताना केवळ आयुर्वेद निर्भय उपचार पद्धती असल्याने ती जागतिक वर्चस्व अल्पावधीत मिळविल, अशी ठाम ग्वाही पद्मभूषण, पद्मश्री वैद्यराज, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ व प्रशासक समितीचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा यांनी येथे दिली.  तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठात 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन उद्घाटन प्रसंगी त्रिगुणा अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी ओम गुरुदेव माऊली, संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, माजी आ. स्नेहलता कोल्हे, अ.भा. आयुर्वेद महासंमेलन अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, प्रांतीय महामंत्री वैद्य प्रवीण जोशी, आत्मा मालिक ध्यान पिठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, वैद्य आशुतोष गुप्ता, मुकुल पटेल, वैद्य सतीश भट्टड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री वैद्यराज त्रिगुणा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शिर्डीलगत कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठात अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन जसे भरवण्यात आले. या धर्तीवर जगन्नाथ पुरी, कर्नाटक, उत्तर प्रदेशसह देशभरात पाच ठिकाणी आयुर्वेद महासंमेलन भरवण्यात येईल. 55 रुग्णालय तसेच या विभागांचे विविध ठिकाणी डॉक्टर्स कार्यरत आहेत, असे सांगत आयुर्वेद उपचार पद्धती अनेक जणांना दिली जाते. ही चिकित्सा पद्धती सर्वदूर देशभर व देशाबाहेर पोहचली आहे. आयुर्वेद पद्धती सर्वांनी अंगीकारावी, स्वतः वैद्य बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, भारतीय संस्कृती महान आहे. धर्मशास्त्राचा ठेवा मोठा असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुर्वेदाचा वारसा पुढे नेत आहेत. जगाला भुरळ घालणारे आयुर्वेद उपचार शास्त्र घराघरात पोहोचण्यासाठी आयुष मंत्रालय मार्फत भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. रोगी नको निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदाचा अवलंब करावा, असे त्या म्हणाल्या.
आत्मा मालिक ध्यान पिठाचे संत परमानंद महाराज म्हणाले, आयुर्वेद जीवन पद्धती आहे. ‘ध्यान करा, ध्यानी बना,’ हा संदेश त्यांनी दिला.
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पद्मभूषण वैद्यराज देवेंद्र त्रिगुणा यांचा आदेश आल्यानंतर केवळ 21 दिवसांत या महासंमेलनाची तयारी केली. या या संमेलनास 2150 देशांतील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सहभाग घेतला. अ. नगर, नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह आयुर्वेद महाविद्यालयांचे 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे डॉ. आव्हाड म्हणाले. सूत्रसंचालन राजश्री पिंगळे व अपश्चिम बरठ यांनी केले.

Back to top button