पुणे: तब्बल नऊ महिन्यांनंतर मेंढपाळांना नुकसानभरपाई | पुढारी

पुणे: तब्बल नऊ महिन्यांनंतर मेंढपाळांना नुकसानभरपाई

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा: गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी थंडीने गारठून मेंढ्या मृत पावल्या. याबाबत तालुका प्रशासनाने व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी पंचनामा करून शासनाला अहवाल सादर केला होता. जवळपास 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या मेंढपाळांना शासनाकडून नुकसानभरपाईचे धनादेश देण्यास सुुरुवात झाली आहे.

येथील संतोष राघू मदने व नामदेव दादा मदने या दोघांना तहसील कार्यालयाकडून नुकसानभरपाईचे धनादेश वाल्हे तलाठी कार्यालयाला धनादेश प्राप्त झाले आहेत. तलाठी कार्यालयामध्ये 36 हजार रुपयांचा धनादेश तलाठी नीलेश अवसरमोल यांनी संतोष राघू मदने यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मदने, कोतवाल आनंद पवार, आडाचीवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनय पवार आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत नामदेव दादा मदने यांना नुकसानीचा धनादेश देणार असल्याचे तलाठी निलेश अवसरमोल यांनी सांगितले.
दरम्यान, गतवर्षी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे वृत्त ”दैनिक पुढारी” ने प्रसिध्द करत मेंढपाळांची व्यथा मांडली होती. मेंढ्याना शेकोटी पेटवून शेक देतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. त्यामुळेच नुकसानभरपाई मिळू शकली, असे मत मेंढपाळांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी ’‘पुढारी” चे आभार मानले.

Back to top button