आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे कार्यकर्ते : एकनाथ शिंदे | पुढारी

आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे कार्यकर्ते : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात परिवर्तन करून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे नेत आहोत. आम्ही महाराष्ट्रात केलेल्या परिवर्तनाचे जगाने दखल घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमच्यातील कोणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनण्यासाठी उठाव केला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील सभेत बोलत होते. उद्धव ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत शिंदे गटावर मिंधे असल्याची टीका केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मिंधे नाहीत तर बाळासाहेब ठाकरेंची खंदे कार्यकर्ते असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणूका सेना-भाजप युती करून लढली. हिंदूत्वाची भूमिका मांडली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही अनेक वर्षे लढलो. मात्र, बाळासाहेब ठाकरे ज्यांना शत्रू समजत होते. त्यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात आमचा नेता असूनही आमच्यावर अन्याय झाला. अन्यायाच्या विरोधात उठाव करून आम्ही सरकार स्थापन केले आहे. मी जिथे जिथे जातो तेथे हजारो लोक पाठींबा देण्यासाठी येत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी कशाच्याही मोहासाठी राजकारण केले नाही.

बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्यासाठी माझ्यासोबत आमदार आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. शिवसेनेला वाढवण्यासाठी आम्ही दिवसरात्र राबलो, तुम्हाला शिवसेना फक्त आमचीच आहे, असे म्हणण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेना लगावला आहे.

मुंबईत गटाप्रमुखांचा मेळावा सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांत गटप्रमुखांची आठवण आली नाही. शिवसैनिकांनी मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही उठाव केल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसैनिक आणि गटप्रमुखांची आठवण आली आहे, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

 

हेही वाचलंत का?

Back to top button