सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: धो-धो पावसात रविवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जगताप माचीजवळ सिंहगड घाट रस्त्यावर भली मोठी दरड कोसळली. त्या वेळी पर्यटकांची वर्दळ नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. त्यामुळे डोणजे मार्ग गडावरील वाहतूक जवळपास तीन तास बंद करण्यात- आल्याने गडावरून खाली येणार्‍या व गडावर जाणार्‍या पर्यटकांचे हाल झाले. वनविभागाने डोणजे-गोळेवाडी मार्ग गडावरील वाहतूक बंद करून युद्धपातळीवर दरडीचा मलबा बाजूला हटविला. त्यानंतर 12 वाजता डोणजे मार्ग वाहतूक सुरू करण्यात आली.

गडावर सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दाट धुके व थंडगार वारे वाहत आहे. पावसाची तमा न बाळगता देशभरातील हजारो पर्यटकांनी गडावर गर्दी केली होती. गणेशोत्सवाची सांगता झाल्याने रविवारी (दि. 18) सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी राज्यासह देशभरातील हजारो पर्यटकांनी धो-धो पावसात सिंहगडावर धाव घेतली. गडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून तब्बल एक लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला.

सकाळी पावसाचा जोर अधिक होता. धो-धो पावसात जगताप माचीजवळील उन्मळून आलेल्या दरडीचा मलबा, मोठे दगड कोसळले. पुन्हा उर्वरित दरड कोसळण्याचा धोका असल्याने वनविभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे, सुरक्षा रक्षक नितीन गोळे, रमेश खामकर, चव्हाण, सांबरे आदी सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.

डोणजे मार्ग वाहतूक बंद करून युद्ध पातळीवर दरडीचा मलबा बाजूला हटविण्याचे काम सुरू केले. पावसामुळे मलबा बाजूला काढण्यासाठी अडथळे येत होते. मात्र, सुरक्षारक्षक व कर्मचार्‍यांनी भर पावसात काही दगड धोंडे हाताने बाजूला काढले. तब्बल साडेतीन तासांनंतर दरडीचा मलबा बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.

दरम्यान, राजगड, तोरणा गडावर, तसेच पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण परिसरातही रिमझिम पावसात पर्यटकांनी गर्दी केली होती. दाट धुके, रिमझिम पावसात चिंब भिजत पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला.

हजारो वाहने गडावर
सकाळी पर्यटकांची वर्दळ कमी होती; मात्र दुपारनंतर गर्दी वाढली. दिवसभरात गडावर चारचाकी 416 व दुचाकी 1 हजार 78 वाहने गेली. आतकरवाडी व इतर पायी मार्गही पर्यटकांनी गजबजून गेले होते. गेल्या आठ दहा दिवसां पासून कोसळत असलेल्या पावसामुळे घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने घाट रस्त्यासह वाहनतळ आदी ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

दरड काढण्यासाठी डोणजे मार्ग वाहतूक बंद करण्यात आली. अवसरवाडी मार्ग वाहतूक सुरू ठेवण्यात आली. दरडी, तसेच इतर धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
– बाबासाहेब जिवडे, वनरक्षक

Back to top button