खून, विनयभंग गुन्ह्यातील फरार आरोपी केला जेरबंद | पुढारी

खून, विनयभंग गुन्ह्यातील फरार आरोपी केला जेरबंद

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : खून तसेच विनयभंगासारख्या तीन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. संतोष हौसराव गोयकर (वय 33, रा. खंडाळा, ता कर्जत) असे या आरोपीचे नाव आहे. गोयकर याच्यावर कर्जत न्यायालयात खुनाचा खटला सुरू आहे. तसेच त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. तो मागील सात-आठ महिन्यापासून फरार होता. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा, तसेच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याने, त्यास वॉरंट काढण्यात आले होते.

पोलिस व न्यायालय या दोघांनाही हवा असणारा आरोपी पोलिसांना सतत चकवा देत होता. वारंवार शोध घेऊनही पोलिसांना तो सापडत नव्हता. अखेर तो मिरजगाव परिसरात आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन राबवित पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, ठाकरे, दीपक कोल्हे, जालिंदर माळशखरे यांनी केली.

Back to top button