अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 302.50 अंक व 952.35 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17530.85 अंक व 58840.79 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.70 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.59 टक्क्यांची घट नोंदवली गेली. जागतिक बँकेच्या एका नव्या अभ्यासानुसार 2023 सालामध्ये विकसित आणि विकसनशील दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने सर्व देशांमध्ये महागाईचे प्रमाण वाढेल म्हणून याला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतील. परंतु, एवढेच पुरेसे नसेल. त्यामुळे उद्योग चक्राला काही काळ खीळ बसेल, हा अहवाल प्रकाशित होताच निफ्टी व सेन्सेक्स शुक्रवारच्या एका दिवसात सुमारे दोन टक्के गडगडले.

* रुपया चलन शुक्रवारच्या सत्रात मागील पाच आठवड्यांच्या सर्वाधिक कमकुवत पातळीवर पोहोचला. रुपया डॉलरच्या तुलनेत 7 पैसे कमकुवत होऊन 79.70 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. भारतीय रोखेबाजारासाठी गतसप्ताह मागील तीन महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह ठरला. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचा भाव शुक्रवारच्या सत्रात 7.2386 टक्क्यांवरून 7.2660 टक्क्यांवर पोहोचला. एकूण सप्ताहाचा विचार करता रोख्यांचा दर 10 बीपीएसने वधारला.

* केंद्र सरकारकडे जमा होणार्‍या अग्रीम थेट करामध्ये (Advance Direct Tax)मध्ये दुसर्‍या तिमाहीअखेर 22 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 1.81 लाख कोटींवर गेला. तसेच अप्रत्यक्ष करांमध्ये ऑगस्टअखेर 14 टक्क्यांची वाढ झाली.

* ऑगस्ट महिन्यात भारताचा घाऊक महागाई दर (होलसेल प्राईस इंडेक्स) मागील 11 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 12.41 टक्क्यांपर्यत खाली आला. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोबरपर्यंत सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर घाऊक महागाईदर 10 टक्क्यांखाली उतरेल.

* ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर (कन्झ्युमर प्राईज इंडेक्स) 6.71 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत पोहोचला. तसेच भारताचा औद्योगिक उत्पादन वृद्धी निर्देंशांक (आयआयपी) मागील चार महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला. जुलै महिन्यात आयआयपी 2.4 टक्क्यांपर्यंत खाली गेला. यामुळे रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारला यापुढे महागाई नियंत्रणात ठेवून औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत.

* वित्त आणि विमा क्षेत्रात कार्य करत असणारी स्टार्ट अप कंपनी ‘नवी टेक्नॉलॉजी’ लवकरच आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरण्याची शक्यता. मार्चमध्ये ‘आयपीओ’ आणण्यासाठी कंपनीने सेबीकडे अर्ज केला. ‘आयपीओ’च्या माध्यमातून सुमारे 2250 कोटी ‘नवी फिनसर्व्ह’ या वित्तसेवा पुरवणार्‍या कंपनीसाठी, तर 150 कोटी सामान्य विमा (जनरल इन्श्युरन्स) कंपनीमध्ये गुंतवले जाणार. आणि उर्वरित रक्कम मुख्य कंपनीच्या कार्यविस्तारासाठी वापरली जाणार.

* शिक्षण क्षेत्रातील ऑनलाईन स्टार्टअप कंपनी ‘बायजूज’चा आर्थिक वर्ष 2021 मधील तोटा मागील वर्षापेक्षा तब्बल 20 पटींनी वाढला. आर्थिक वर्ष 2020 मध्ये असणारा 231.69 कोटींचा तोटा. आर्थिक वर्ष 2021 मध्ये थेट 4588 कोटींवर पोहोचला. ‘बायजू’ कंपनीचे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस कंपनीला आर्थिक वर्ष 2021 मध्ये खरेदी केले. त्यासाठी ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’मधील गुंतवणूकदार ‘ब्लॅकस्टोन’ला बायजू 1983 कोटी देणे लागते. यापूर्वी जून 2022 मध्ये परतफेड करणे अपेक्षित होते; परंतु आता ‘बायजू’ला 23 सप्टेंबरपर्यंत हे देणे परतफेड करणे अपेक्षित आहे.

* पतमानांकन संस्था ‘फिच’ने आर्थिक वर्ष 2022 मधील भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीदर अंदाज 7.8 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत खाली आणला. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस खनिज तेलाचे भाव वाढल्याने भारताची आयात किंमत वाढली. परिणामी महागाई आणि त्यामुळे देशातील व्याजदर वाढले. या सगळ्याची परिणिती अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावण्यात झाली.

* फे्ंरच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टूकन भारताचे गौतम अदानी जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अदानींची एकूण संपत्ती 155.4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. सध्या अदानींपेक्षा केवळ ‘टेस्ला’ कंपनीचे ‘इलॉन मस्क’ यांची संपत्ती 273.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे, तर 92.2 अब्ज संपत्तीसह मुकेश अंबानी जगातील 8 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

* 9 सप्टेंबर अखेर भारताची विदेश चलन गंगाजळी 2.234 अब्ज डॉलर्सनी घटून 550.871 अब्ज डॉलर्स इतकी झाली.

Back to top button