राजगुरूनगर बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्याचा प्रयत्न, अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांची माहिती | पुढारी

राजगुरूनगर बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्याचा प्रयत्न, अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांची माहिती

राजगुरूनगर : पुढारी वृतसेवा : राजगुरूनगर सहकारी बॅंकेची आर्थिक घोडदौड कायम असुन नजीकच्या काळात बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी दिली. राजगुरूनगर सहकारी बँकेची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. १८) झाली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष वाळुंज बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास झालेल्या या सभेत विविध विषयांवर गरमागरम चर्चा झाली. ज्येष्ठ सभासद, संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी दीपप्रज्वलन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी सर्वांचे स्वागत केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी मागील ऑनलाइन सभेचे अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष अरुण थिगळे, किरण आहेर, किरण मांजरे, गणेश थिगळे, सतीश नाईकरे, दिनेश ओसवाल, राहुल तांबे पाटील, सागर पाटोळे, विजयाताई शिंदे, हेमलता टाकळकर, परेश खांगटे, ॲड. डी. के. गोरे, धनंजय कहाणे, ॲड. सुरेश कौदरे, ॲड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, के. डी. गारगोटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेचे अहवाल बहुतांश सभासदांना मिळाला नाही यावरून सुरुवातीलाच हिरामण सातकर, कोंडीभाऊ टाकळकर, खंडेराव थिगळे, मारुती सातकर, अनंत भालेकर यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. थकीत कर्ज प्रकरण आणि त्याची वसुली यावरून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, ॲड. निलेश आंधळे, बापु बोरसे, कुंडलीक कोहिणकर, भगवान भांबुरे, प्रकाश पाचारणे, श्रीराम खेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले. वसुलीसाठी बँकेने ८६४ दावे दाखल करण्यात आल्याचे अध्यक्ष वाळुंज यांनी सांगितले.
आयडियल ओव्हर ड्यु संदर्भात होणाऱ्या कर्ज कारवाईबाबत तसेच बँकेच्या १७ शाखा असुन त्यातील किती शाखा तोट्यात आहेत? असा प्रश्न विजय डोळस यांनी विचारला. गेली दोन वर्षे तोटा सहन केल्याने सभासदांना लाभांश वाटप झाला नाही.

यावेळी बँकेचे कायदेशीर सल्लागार बदलण्याची मागणी करण्यात आली. व्यक्तिगत संबंधावर कर्ज प्रकरणे दिली जातात, असा आरोप अनिलबाबा राक्षे यांनी केला. चाकण एमआयडीसी परिसरातील कुरुळी येथे बॅंकेची शाखा सुरू करावी तसेच मोठ्या व नियमित कर्जदारांना व्याज सवलत द्यावी, अशी मागणी सरपंच शरद मु-हे यांनी केली. दत्ता भेगडे, हनुमंत फदाले, धनंजय भागवत, ॲड. गणेश सांडभोर, स्वानंद खेडकर, ज्ञानेश्वर मुंगसे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याधिकारी शांताराम वाकचौरे, अध्यक्ष राजेंद्र वाळुंज यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिले. उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Back to top button