पुणे : हंगामी शिक्षकांना बिगार्‍यापेक्षाही कमी वेतन; विद्येच्या माहेरघरातील शिक्षकांची व्यथा | पुढारी

पुणे : हंगामी शिक्षकांना बिगार्‍यापेक्षाही कमी वेतन; विद्येच्या माहेरघरातील शिक्षकांची व्यथा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमधील हंगामी शिक्षकांना केवळ 15 हजार मानधन मिळते, तर पिंपरी – चिंचवडमध्ये 25 हजार मानधन मिळते. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षकांची अवस्था चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यापेक्षाही वाईट असल्याचे स्पष्ट झाले आहे.  कोरोना प्रादुर्भाव काळात खासगी शाळेतील फी मुळे अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश महापालिकेच्या शाळांमध्ये घेतले. त्यामुळे महापालिका शाळांचा पट वाढला आहे. त्यामुळे 289 शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

तरी देखील त्यातून फक्त 120 शिक्षक सेवेत रुजू झाले. या शिक्षकांना एकवट 15 हजार मासिक पगार दिला जातो. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षकांना एकवट 25 हजार मासिक पगार देत आहे. बांधकाम साईटवर काम करणारे बिगार्‍याला दररोज 800 रुपये मिळतात. गवंड्याची दररोजची हजेरी 1 हजार रुपये आहे. कायमस्वरुपी शिक्षकांना 50 हजारांपेक्षा अधिक वेतन आहेत. सातव्या वेतन आयोगानंतर पगारामध्ये बरीच वाढ झाली आहे. हंगामी शिक्षक कायमस्वरुपी शिक्षकांप्रमाणेच शिकवातात. असे असताना त्यांच्या शिक्षणाचा महापालिका प्रशासनाकडुन थट्टा केली जात आहे.

हंगामी शिक्षकांची आपण भरती करतो, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचे मानधन 12 हजार रुपये होते. यामध्ये वाढ करून 15 हजार करण्यात आले आहे.
                                   – मीनाक्षी राऊत, शिक्षण विभाग प्रमुख, महापालिका

Back to top button