T20 World Cup : टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; ‘या’ खेळाडुने केले पुनरागमन | पुढारी

T20 World Cup : टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; ‘या’ खेळाडुने केले पुनरागमन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup)१५ सदस्यीय पाकिस्तान संघाची घोषणा केली असून, तिघांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. बाबर आझम संघाचा कर्णधार असेल, तर शादाब खान उपकर्णधार असेल. एकूणच, पाकिस्तानचा संघ अतिशय संतुलित आणि विजेतेपदाचा दावेदार दिसत आहे. कारण, या संघात मधल्या फळीत असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे चेंडू तसेच बॅटने सामन्याचे चित्र पलटण्याची क्षमता आहे.

शाहीनचे पुनरागमन (T20 World Cup)

पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे संघात पुनरागमन झाले आहे. शाहीनला दुखापतीमुळे अलीकडेच आशिया कप स्पर्धेत भाग घेता आला नाही आणि त्याला पूर्वी 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. आफ्रिदीला जुलैमध्ये गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. निश्चितच, आफ्रिदीची संघात निवड केल्याने पाकिस्तान व्यवस्थापनाला खूप आत्मविश्वास मिळेल कारण तो सामन्याची उलथापालथ स्वबळावर करू शकतो.

‘या’ बिग हिटरला मिळाली नाही संधी (T20 World Cup)

शान मसूदच्या रूपाने अशा खेळाडूची संघात निवड करण्यात आली आहे ज्याने आतापर्यंत पाकिस्तानसाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. मसूदने वनडे आणि कसोटी सामने खेळले असले तरी हैदर अलीला पुन्हा संघात बोलावण्यात आले आहे. हैदर अली हा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता, पण मोठे फटके मारणाऱ्या लेफ्टी फखर जमानची संघात निवड झाली नाही, हा एक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बरीच चर्चा होऊनही माजी कर्णधार शोएब मलिक संघात स्थान मिळू शकले नाही.

…आणि म्हणूनच हैदर अली पुन्हा आला(T20 World Cup)

बिग हिटर फखर जमानच्या जागी हैदर अलीची संघात पुन्हा निवड करण्यात आली आहे. फखरची जमानला यंदा फारसे काही करता आले नाही. यामुळेच त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. फखरने यावर्षी खेळल्या गेलेल्या 7 टी-20 सामन्यांमध्ये 13.71 च्या सरासरीने केवळ 96 धावा केल्या. त्याचबरोबर हैदरने यापूर्वी पाकिस्तानसाठी २१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 23.88 च्या सरासरीने तीन अर्धशतके झळकावली. निवड समितीचे सदस्य मोहम्मद वसीम म्हणाले की, आमच्याकडे असा संघ आहे जो २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल.

पाकिस्तान संघ खालीलप्रमाणे

1. बाबर आझम (कर्णधार) 2. शादाब खान (उपकर्णधार) 3. आसिफ अली 4. हैदर अली 5. हॅरिस रौफ 6. इफ्तिखार खान 7. खुशदिल शाह 8. मोहम्मद हसनैन 9. मोहम्मद नवाज 10. मोहम्मद रिजवान 11. मोहम्मद वसीम 12. नसीम शाह 13. शाहीन आफ्रिदी 14. शान मसूद 15. उस्मान कादिर.

राखीव खेळाडू: फखर जमान, मोहम्मद हॅरिस, शाहनवाज दहानी

Back to top button