Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची बॅट नेहमीच तळपते, जाणून घ्या आकडेवारी… | पुढारी

Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची बॅट नेहमीच तळपते, जाणून घ्या आकडेवारी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता तीन सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत खेळवला जाईल. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन संघ लवकरच भारतात येणार आहे. दरम्यान, या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहेत. त्याने आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक फटकावले. तब्बल 1020 दिवसांनी त्याने शतकाला गवसणी घातली. हे त्याचे करिअरचे 71 शतक ठरले.

आता रन मशिन म्हणून समजल्या जाणा-या कोहलीचा (Virat Kohli) हा फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्धही असाच कायम राहतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या सर्व टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीची कामगिरी विशेष राहिली आहे.

असे आहेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचे आकडे…

कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 718 धावा फटकावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची सरासरी 59.83 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 146.23 आहे. 2020 नंतर कोहली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामना खेळायला येणार आहे. यापूर्वी जेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती, तेव्हा त्याने सिडनीमध्ये शेवटची 85 धावांची खेळी केली होती. कोहलीने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 9 तर दुसऱ्या सामन्यात 40 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीचा फॉर्म गेला आणि त्याच्या बॅटमधून येणारी मोठी खेळी जवळपास थांबली.

विराटची आतापर्यंत 71 आंतरराष्ट्रीय शतके…

विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म परत आला असून त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिले शतकही झळकावले आहे. त्याच्या शतकांची संख्याही 70 वरून 71 झाली आहे. आशिया कप मधील शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. आता तो भारताचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकांच्या मागे आहे. कोहलीची चांगली गोष्ट म्हणजे तो 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये आला आहे आणि येत्या विश्वचषकातही त्याचा फॉर्म कायम राहिला तर विरोधी संघांला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. पण त्याआधी तो ऑस्ट्रेलिया आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.

Back to top button