हिंजवडी : रस्त्यावर कचरा टाकाल तर होईल शिक्षा, कचरा बहाद्दरांना पाच हजारांचा दंड आणि पोलिसांचा ससेमिरा | पुढारी

हिंजवडी : रस्त्यावर कचरा टाकाल तर होईल शिक्षा, कचरा बहाद्दरांना पाच हजारांचा दंड आणि पोलिसांचा ससेमिरा

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : आयटी नगरी हिंजवडीच्या परिसरातील नेरे, मारुंजी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक भाडेकरू आणि बाहेरील नागरिकांनी या परिसरात कचरा टाकून परिसर बकाल केला आहे. अनेकदा सांगून, विनवण्या करूनदेखील या ‘कचराबहाद्दर’ वठणीवर येत नसल्याने या ग्रामपंचायतींनी ठेकेदारामार्फत अजब योजना आखली आहे.  आता रोख स्वरूपातील 5000 रुपये व त्यापेक्षा अधिक दंडासह शिक्षा होत असल्याने अनेक जण रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे बंद केले असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

आयटीच्या झगमगाटात हिंजवडी पंचक्रोशीतील गावांचा चेहरा मोहरा बदललेला असताना, आयटीतील रस्त्यांवर मात्र कचर्‍याच्या ढिगार्‍यांचे ओंगळवाणे प्रदर्शन कायम घडते. यावर मात्र शक्कल लढवली आहे. त्यामुळे आता कचरा बहाद्दरांना उठाबशांच्या प्रसादासह पाच हजारांचा दंड आणि पोलिसांच्या ससेमिर्‍याला सामोरे जावे लागू शकते.  नेरे मारुंजी ग्रामपंचायतीने घरगुती कचरा संकलनासाठी विविध संस्थांना लाखो रुपयांचे टेंडर दिले आहे. त्यानुसार आठ ते दहा घंटागाडी घरोघर फिरतात. तरीही काहीजण ट्रॅक्टरमध्ये कचरा न टाकता छुप्या पद्धतीने नेरे मारुंजी या मुख्य रस्त्यावर कचरा टाकतात.

त्यामुळे रस्त्यात जागोजागी कचर्‍याचे ढिगारे साचून दुर्गंधी व अस्वच्छता पसरत आहे. ही घाण आरोग्यासाठी हानिकारक तर आहेतच. या शिवाय ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा पोचविणारी आहे. याबाबत जनजागृती, उपाययोजना, फलकबाजी, उघड्यावर कचरा न टाकण्याचे आव्हान व दंडात्मक कार्यवाही करूनदेखील कचर्‍यांचे ढिगारे वाढतच राहिले. या ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा खर्च करूनही या कचरा बहाद्दरांमुळे नामुष्की ओढवत आहे.

त्यामुळे प्रभाकर शिंदे, बाबूराव बुचडे, संदीप जाधव, गजानन शिंदे, विशाल सावंत, रोहित जाधव, सुग्रीव कदम, अजित पवार यांच्यासह काही ग्रामस्थांनी स्वतःचा नेरे मारुजी पॅटर्न तयार केला.  कचरा साचणार्‍या ठिकाणी आजूबाजूला या पथकातील दोघे दिवसा आणि दोघे रात्री लपून दबा धरून बसतात. पाळत ठेवून कचरा टाकणार्‍याला रंगेहाथ पकडून त्याला उठाबशा काढायला लावले जाते आणि ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन, पाच हजारांच्या दंडाची पावती फाडली जाते.

‘उठा बशा’ योग्य नाही
गावातील युवकांनी एकत्र येऊन दंड वसूल करण्याच्या या प्रकारामुळे त्यांचे स्वागत होत आहे. मात्र, तरीही शिक्षा देऊन ‘उठा बशा’ काढावयास लावणे. कॅमेर्‍यासमोर माफी मागवणे, हा प्रकार काही ग्रामस्थांना पटत नाही. यावर अनेकांनी विरोध दर्शविला आहे.

Back to top button