पुणे : पाऊस काही पाठ सोडेना; लोणी-धामणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस | पुढारी

पुणे : पाऊस काही पाठ सोडेना; लोणी-धामणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सततच्या पावसाने ऊस पीक पिवळे पडू लागले आहे. काढणीला आलेले सोयाबीन वाया गेले आहे. बाजरीचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे, तरकारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात रविवारी (दि. 11) सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आला, तर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धामणी येथील गवंडीमळ्यात वीज पडून बैलगाडा शर्यतीचा एक बैल मृत्युमुखी पडला. पुरामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पारगाव-लोणी रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले.
रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लोणीचा डोंगरभाग तसेच धामणीच्या धनगरदरा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस होऊन ओढ्या-नाल्यांना पूर आला. शेताचे बांध फुटून शेतांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याबरोबर वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सुमारे एक तास हा पाऊस पडत होता. लोणी गावालगत पारगाव-लोणी रस्त्यावरील ओढ्याला पूर येऊन पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले होते. मोटारसायकलवरून चाललेला तरुण पुराच्या पाण्यात अडकला व पुराबरोबर मोटारसायकलसह वाहत जात असताना तरुणांनी तत्परता दाखवून त्याला पुराबाहेर काढून त्याचा जीव वाचवला. रात्री उशिरा पूर ओसरल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

लोणी परिसरात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील यांनी केली आहे. खडकवाडी परिसरातही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातही नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके व उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी केली आहे. धामणी येथील गवंडीमळ्यात नामदेव महादू गवंडी यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील झाडावर वीज पडल्याने गोठ्यातील शर्यतीचा बैल जागीच ठार झाला. परिणामी, गवंडी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून गवंडी यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सरपंच सागर जाधव यांनी केली आहे. धामणी गावालगतच्या ओढ्याला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Back to top button