खासदार नवनीत राणांवर गुन्हा दाखल करा; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी | पुढारी

खासदार नवनीत राणांवर गुन्हा दाखल करा; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : रागाच्या भरात तरुणी घरातून निघून गेल्याच्या प्रकरणाला लव जिहादचे वळण देत पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करत खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केली आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देत गुरुवारी (८ सप्टेंबर) तक्रार दाखल केली.

 नवनीत राणा यांनी एका मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी दुपारी संताप व्यक्त केला. मुलीला शोधण्यात पोलीस कमी पडत आहेत असा आरोप करून पोलिसांशी हुज्जत घातली. या संपूर्ण प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा झाली. परंतू पोलिसांनी मुलगी पळून जाण्याच्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेगाने तपासाची सूत्रे फिरवीत तरुणीचा शोध सुरु ठेवला. अखेर ती मुलगी पुणे जात असताना सातारा रेल्वे स्थानकावर सापडली. पोलिसांनी मुलीला पळून जाण्याचे कारण विचारले असता, काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचे केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे दिसून आले.

पुण्याला जाण्यासाठी निघाली होती तरूणी

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय तरुणी मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी घरातून कॉलेजकरिता बाहेर निघाली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या वेळेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. यानंतर राजापेठ पोलिसांनी मुलीला शोध घेतला असता, ती रेल्वेने पुण्याला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा जबाब नोंदविला. यावेळी काही कारणांनी रागाच्या भरात मी घर सोडले, असे तरुणीने पोलिसांनी सांगितले, तशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे निवेदन

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी सरकारने नियुक्त केलेल्या एक दुवा आहे. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधी जर अपमानात पद वागणूक देत असतील तर हे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याचा तीव्र शब्दांत निषेध करीत खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button