बारामती हा बालेकिल्ला नव्हे तर टेकडी! आमदार पडळकरांचा बारामतीत पवारांवर जोरदार हल्लाबोल | पुढारी

बारामती हा बालेकिल्ला नव्हे तर टेकडी! आमदार पडळकरांचा बारामतीत पवारांवर जोरदार हल्लाबोल

बारामती, पुढारी वृत्तसेवा: भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. बारामती तुम्ही पवारांचा बालेकिल्ला कसे म्हणता ही तर नुसती टेकडी असल्याचे ते म्हणाले. पडळकर म्हणाले, २०२४ ला बारामतीतून पवारांचे कोणत्याही परिस्थितीत विसर्जन होणार. त्यांना लुबाडून, फसवून घेण्यात नेहमीच आनंद वाटत आला आहे. त्यातूनच त्यांनी मागे अनैसर्गिक युती करत राज्याची सत्ता हस्तगत केली होती. मागील सत्ता स्थापनेनंतर झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या वरमाई असल्याप्रमाणे नटूनथटून प्रत्येकाचे स्वागत करत होत्या. जणू काही त्यांना जनतेने निवडून देत सत्ता स्थापनेपर्यंत नेल्याचा त्यांचा अविर्भाव होता.

फडणवीस यांना सत्ता मिळू नये, अशी पवारांची मनोमन इच्छा होती, परंतु फडणवीस यांनी त्यावर मात केली, हे खरे शरद पवार यांचे दुःख आहे. त्यांचे विसर्जन करण्यासाठी बावनकुळे बारामतीत आले आहेत. शरद पवार यांना आता श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षाला जसे पळून जावे लागले होते, तसे जावे लागेल. मी गेली अडीच वर्षे पवारांवर बोलतो आहे. अधिकाऱ्यांच्या जीवावर त्यांचे राजकारण चालते. आपले चुकीचे नसेल तर बिनधास्त व्यक्त व्हायला हवे. त्यातून माझ्या गाडीवर दोनदा दगडफेक झाली. केसेस झाल्या, मला जेलमध्ये बसावे लागले. पण, आपण घाबरण्याचे काही कारण नाही. केसेस या आपल्याला दागिन्यांसारख्या आहेत. येथील नेतृत्वाने राज्याला भ्रष्टाचाराचा, जातीयवादाचा डाग लावला. त्यांना आता आरती करतानाचे व्हिडिओ टाकावे लागत आहेत, हे भाजपचे यश असल्याचे ते म्हणाले.

पांढऱ्या पायाचे सरकार मागे सत्तेवर आले. त्यांनी मराठा आरक्षण घालवले, ओबीसी आरक्षण घालवले. नवीन सरकार आल्यावर ओबीसींना हक्क मिळाला. बारामतीच्या विकासाचे माॅडेल खोटे आहे. येथे विकास झाला म्हणता तर पंचायत समितीत टॅंकरसाठी प्रस्ताव दाखल का होतात. येथील ४० गावांच्या पाणी प्रश्नासाठी बावनकुळे यांनी पुढाकार घेत जलसंपदामंत्र्यांशी बैठक लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

सीतारामण या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डाॅक्टर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डाॅक्टर आहेत. त्या बारामतीचे ऑपरेशन कधी करतील हे पवारांना कळायचेही नाही, असे पडळकर म्हणाले.

Back to top button