‘सिरम’ने विकसित केलेली गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिली स्वदेशी लस लाँच! | पुढारी

‘सिरम’ने विकसित केलेली गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिली स्वदेशी लस लाँच!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिली स्वदेशी लस गुरुवारी दिल्लीत लाँच करण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केलेली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ही लस लाँच करण्यात आली. यावेळी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

महिलांतील ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय आहे. दरवर्षी या दोन प्रकारच्या कॅन्सरमुळे असंख्य महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागते. मात्र आता याच्यावरील उपचारासाठी सिरमने लस विकसित केली आहे. ‘सव्र्हावॅक’ या नावाने ओळखली जाणारी ही लस देशातली अशा प्रकारची पहिलीच लस आहे. सिरम इन्स्टिट्यूटने लसीच्या विकासाच्या केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान खात्याची मदत घेतलेली आहे. ‘क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस‘ हे लसीचे शास्त्रीय नाव आहे. सध्या गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस भारताला विदेशातून आयात करावी लागते. यापुढील काळात स्वदेशी लस उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना माफक दरात गर्भाशयाच्या कॅन्सरवर उपचार करून घेता येणे शक्य होणार आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात सिरम इन्स्टिट्यूटला गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लसीच्या निर्मितीला परवानगी दिली होती. सिरमकडून विकसित करण्यात आलेली ही लस म्हणजे जैवतंत्रज्ञान विभाग आणि सिरमच्या वाटचालीतील मैलाचा टप्पा आहे, असे डॉ. जितेंद्र सिंग यांनी यावेळी सांगितले. या लसीमुळे माफक दरात रुग्णांवर उपचार करता येतील, असे सांगून सिंग म्हणाले की, ज्या कारणांमुळे कॅन्सर होतो, त्यात गर्भाशयाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांत एक चतुर्थांश लोक गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मरण पावतात. गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतो, असे असूनही अशा रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी सुमारे सव्वा लाख महिलांना या प्रकारातील कॅन्सरचे निदान होते. यातील 75 हजार महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागते. ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस‘ विरोधात लसीकरण करण्याचे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो, त्यामुळे सिरमने विकसित केलेल्या लसीला विशेष महत्व आहे.

लस विकसित करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागाकडून महत्वाची मदत झाल्याचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी यावेळी सांगितले. जैवतंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अलका शर्मा यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास ग्रँड चॅलेंजेस इंडियाचे संचालक डॉ. शिरसेंदू मुखर्जी, एम्स रुग्णालयाच्या डॉ. नीरजा भाटला, इनक्लॅन ट्रस्टचे डॉ. एन. के. अरोरा, सिरमचे कार्यकारी संचालक डॉ. उमेश शाळीग्राम, प्रा. गुरुप्रसाद मुडिगेशी, डॉ. देवसेना अनंतरामन हेही उपस्थित होते.

Back to top button