शिवसेना ‘एमआयएम’बरोबरही युती करेल: भरतशेठ गोगावलेंचा टोला | पुढारी

शिवसेना 'एमआयएम'बरोबरही युती करेल: भरतशेठ गोगावलेंचा टोला

महाड; पुढारी वृत्तसेवा : विधीमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध समाज घटकांना दिलासा देण्याचे निर्णय घेण्यात आले. त्याबरोबरच विकास प्रक्रियेला गती देण्याचे काम झाले असल्याचे प्रतिपादन महाडचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी आज (दि.२८) माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीबाबत बोलताना ते आता एमआयएम बरोबरही युती करतील, असा टोला देखील त्‍यांनी लगावला.

शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत हेक्टरी १३ हजार रुपये नुकसानभरपाई, आपदग्रस्तांना ५ ऐवजी १५ हजार रुपयांची मदत, बागायतदारांना ३ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ३६ हजारांची मदत, पोलिसांना घरांसाठी भराव्या लागणाऱ्या रकमेत ३० लाखांऐवजी १५ लाख रुपये करण्याचा निर्णय, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत, असे दिलासादायक निर्णय या अधिवेशनात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या कायमची संपुष्टात आणण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करुन ३४० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या इंदापूर ते पळस्पे दरम्यानच्या रस्त्याचेही काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. महाड परिवहन आगाराच्या नव्या आगाराचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपण परिवहन विभागाची देखील जबाबदारी असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना वेळेवर मानधन मिळत नाही. याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडबरोबर युती केली आहे. यावर ते म्हणाले की, ठाकरे सेना स्व. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेली असल्याचे हे निदर्शक आहे. ठाकरे सेनेची अवस्था नाजूक झाली आहे. विचारसरणीत फरक असलेल्या संभाजी ब्रिगेडबरोबरच काय, त्यांनी एमआयएमबरोबरही युती केली, तरी आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही लगावला. हिंदुत्ववादी भाजपबरोबर जाण्याचा आग्रह आम्ही वारंवार करीत होतो, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. संभाजी ब्रिगेडच्या युतीचा राज्यात आणि महाड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही फरक पडणार नाही, असा विश्वासही गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button