INDvsPAK Asia cup : भारत विरुद्ध पाकिस्तान ‘महामुकाबला’! ‘ते’ पाच सामने विसरणे अशक्य | पुढारी

INDvsPAK Asia cup : भारत विरुद्ध पाकिस्तान ‘महामुकाबला’! 'ते' पाच सामने विसरणे अशक्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsPAK Asia Cup : आगामी आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या लढतीसाठी सज्ज आहे. 2021 मधील टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोन्ही संघ 28 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आमनेसामने येतील. एकदिवसीय विश्वचषक आणि टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया चषकमध्ये भीडणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून आता पासून क्रिकेट तज्ज्ञ खळबळजनक दावे करण्यात व्यस्त झाले आहेत. भारत चिरुद्ध पाकिस्तान यांच्यातील शेवटचा वनडे सामना 2018 मध्ये झाला होता. यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये एकमेकांशी दोन हात करतील. चार वर्षांनंतर आशिया चषक होत असल्याने, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांमध्ये काय झाले हे तपासण्याची ही योग्य वेळ आहे.

भारत पाकिस्तान सामना नेहमीच रोमांचक असतो पण यावेळी तो आणखी खास असेल कारण गेल्या वेळी म्हणजे टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा १० विकेट्स राखून पराभव केला होता. तो पराभव टीम इंडियासह चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेतील त्या पराभवाचा बदला घ्यायचाच आहे. आशिया चषकाच्या इतिहासात दोन्ही देशांमधील जवळपास सर्वच सामने संस्मरणीय ठरले आहेत, परंतु काही सामने असे आहेत जे आजही दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. (INDvsPAK Asia Cup)

2010 – हरभजनच्या वादळी खेळीने पाक गोलंदाजांची दमछाक

2010 च्या आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना थरारक झाला होता. गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने मैदानावरील वातावरण तंग झाले होते. त्यावेळचे अंपायर बिली बाऊडेन यांना दोघांच्या वादात हस्तक्षेप करून तो मिटवावा लागला. पण गंभार आणि अकमल यांच्यातील वादामुळे दोन्ही देशांचे क्रिकेटपटू सामन्यात विजय मिळवण्यासाठी पेटून उठले. प्रेक्षकही जोरदार प्रोत्साहन देऊ लागले होते. पण गौतम गंभीरच्या विकेट पडल्यानंतर भारताचा डाव गडगडला होता. पाकला विजयाची संधी होती. पण ऐनवेळी हरभजन सिंगने वादळी खेळी करून पाकिस्तान गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर अभूतपूर्व षटकार ठोकत टीम इंडियाला रोमांचक विजय मिळवून दिला.

2012 – तेंडुलकरचा आशिया कपमधील शेवटचा सामना

2012 च्या आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील खेळाने भारतीय चाहत्यांना थोडे दु:खी केले कारण हा सचिन तेंडुलकरचा आशिया कपमधील शेवटचा सामना होता. लिटिल मास्टरने 48 चेंडूत 52 धावा करून 331 धावांचे मोठे आव्हान उभे केले. त्यानंतर चेस मास्टर समजल्या जाणा-या विराट कोहलीने एक खास योजना आखत पहिल्या चेंडूपासूनच त्याने पाक गोलंदाजांवर दबाब राखला. त्याने 142 चेंडूत 183 धावा केल्या. त्याची ही एक शानदार खेळी होती. या शतकी खेळीमध्ये कोहलीचे सावधगिरी आणि आक्रमकतेचे मिश्रण पहायला मिळाले. टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर लिलया पेलत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

2014 – शाहिद आफ्रिदीच्या स्फोटक फलंदाजीने भारताचा पराभव

बूम बूम आफ्रिदीने 2014 मध्ये मीरपूर (बांगलादेश) येथे झालेल्या आशिया चषक सामन्यात आपली क्रूर ताकद दाखवली होती. ताकदीने सिक्स मारण्याच्या कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिदीने रवींद्र जडेजा आणि अश्विनच्या गोलंदाजीची पिसे काढली. आफ्रिदीच्या त्या स्फोटक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला एक विकेट राखून मात दिली. पाकिस्तानने 17 षटकांत 96 धावा करत 245 धावांचे लक्ष्य गाठले. मधल्या षटकांमध्ये पाक खेळाडू एकापाठोपाठ तंबूत परतत होते, त्यावेळी भारताने सामन्यात पुनरागमन केले होते. हा सामना भारत जिंकणार असे वाटत असताना पाकिस्तानसाठी आफ्रिदी धावून आला आणि त्याने 12 चेंडूत 34 धावा करून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

2016 – मोहम्मद अमीर बंदी निश्चित केल्यानंतर परतला

2016 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक संस्मरणीय सामना खेळला गेला. त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकेही खेळू शकला नाही आणि संपूर्ण डाव केवळ 83 धावांवर आटोपला. भारताला लक्ष्य सोपे वाटत होते पण मोहम्मद अमीरने तीन विकेट घेत सामन्यात खळबळ उडवून दिली. विराट कोहलीने कठीण परिस्थितीत 49 धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघाने 27 चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्स राखून सामना जिंकला. (INDvsPAK Asia Cup)

Asia Cup 2016: India vs Pakistan - Player vs Player stats

2018 – भारताचा खात्रीशीर विजय

आशिया कप 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा भिडले. दोन्ही प्रसंगी भारतीय संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. तसे पाहता, सुपर-4 टप्प्यात खेळलेला सामना खूप खास होता जिथे भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला होता. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात शोएब मलिकच्या 78 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 50 षटकात 7 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 63 चेंडू बाकी असताना 9 विकेट्स राखून सामना जिंकला. शिखर धवनने सर्वाधिक 114 आणि कर्णधार रोहित शर्माने नाबाद 111 धावा केल्या. (INDvsPAK Asia Cup)

Back to top button