India @ 75 : मंगल पांडेंना फाशी देण्यास सर्व जल्लादांनी दिला होता नकार, पण… | पुढारी

India @ 75 : मंगल पांडेंना फाशी देण्यास सर्व जल्लादांनी दिला होता नकार, पण...

ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीयांनी उभारलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाची पहिली गोळी १६५ वर्षांपूर्वी २९ मार्च १८५७ रोजी कोलकात्याजवळील बराकपूर या लष्करी छावणीत झाडली गेली. ब्रिटिशांविराेधातील ठिणगी अल्‍पवधीत देशभर पाेहचली. साम्राज्‍यशाहीच्‍या विराेधात  भडका उडाला.  एकप्रकारे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात मंगल पांडे यांच्या बंडाने झाली. जाणून घेऊया, या महान स्वातंत्र्य योद्ध्याच्या आयुष्यातील झंझावात…

मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील नगवा येथे १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुद्ध इत्यादी युद्धकलांमध्ये ते पारंगत होते. त्याबरोबरच ते हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. वयाच्या १८४९ साली अवघ्या २२व्या वर्षी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली. पांडे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बीएनआय तुकडीच्या पाचव्या कंपनीत काम करत होते.

१७५७ मध्ये प्लासीच्या लढाईतील विजयानंतर, ईस्ट-इंडिया कंपनीचे कर्मचारी देशभरातील ‘व्यापारी’ तसेच ‘शासक’ बनले. हळूहळू त्यांची हुकूमशाही वाढू लागली, अशा परिस्थितीत क्रांतीची मशाल घेऊन कोणीतरी पुढे येणे ही त्यावेळची गरज होती. पण ब्रिटीश सत्तेपुढे ब्र काढण्याची ताकद कुणामध्ये नव्हती. लोकांनी गुलामगिरी हे आपले नशीब म्हणून स्वीकारले होते. पण १८५७ मध्ये एका सैनिकाच्या बंडाने संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध वातावरण निर्माण केले.

कोलकात्याजवळील बराकपूर येथील पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावक्याची बातमी छावण्यांमध्ये पसरली होती. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली जनावारांची चरबी तोंडात जाऊ शकेल, या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. झाले असे की, मार्च १८५७ मध्ये, बराकपूर येथे ब्रिटीश छावणीच्या ३४ व्या पलटणीची परेड सुरू होती. परेड दरम्यान, एक १४४६ क्रमांकाचा संतप्त सैनिक बंदुकीसह समोर आला. त्याने प्राण्यांची चरबी असलेली काडतुसे वापरण्यास नकार दिला. एवढेच नाही तर इंग्रजांवर आमचा धर्म भ्रष्ट केल्याचा आरोपही केला. त्या सैनिकाचे नाव होते मंगल पांडे. आणि इथून सुरू होते इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या बंडाची कहाणी.

ब्रिटीश सैन्यात असूनही त्या वेळी त्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस क्वचितच कोणी केले होते. प्राण्यांच्या काडतुसामुळे मंगल पांडे हे इतके संतप्त झाले होते की, त्यांनी इंग्रजांच्या चुकीच्या वागणुकीला उत्तर द्यायचे ठरवले. मंगल पांडे यांनी अवाज उठवला त्या दिवशी छावणीत गोऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. ब्रिटिशांनी शांत डोक्याने वेगळी चाल खेळली. मंगल पांडे आणि पलटणीतील इतर सैनिकांना शांत करत त्यांनी परस्पर ब्रह्मदेशहून (म्यानमार) गोऱ्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला चोख उत्तर देण्याचा निश्चय केला. त्यांचे पहिले टार्गेट बराकपूर छावणी होते. दरम्यान, इंग्रजांच्या षड्यंत्राची चाहूल लागताच मंगल पांडे यांनी आपल्या साथीदारांना उठाव करण्याचे आवाहन केले.

दुसरीकडे मंगल पांडे यांनाच पकडण्यासाठी सार्जंट मेजर ह्यू सन याने आदेश दिला. मात्र, छावणीतील एकही सैनिक पुढे आला नाही. उलट संतापलेल्या मंगल पांडे यांनीच पहिली गोळी सार्जंट मेजर ह्यू सनवर झाडली. हे पाहताच लेफ्टनंट बॉ घोड्यावर स्वार होऊन मंगल पांडेवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. हे पाहून मंगल पांडेने पुन्हा बंदुकीत काडतुस भरण्यासाठी प्रयत्न केला. पण क्षणार्धात जमनीवर कोसळेल्या लेफ्टनंट बॉ याने मंगल यांच्यावर पिस्तुल रोखले. मात्र, न डगमगता मंगल पांडे यांनी आपल्याकडील तलवारीने बॉ याच्यावर प्रतिहल्ला केला. बॉनेही गोळी झाडली. पण तो नेम चूकला आणि मंगल पांडे बालबाल बचावले. तलवारीच्या जोरावर मंगल पांडे यांनी बॉ याला आस्मान दाखवले. मंगल पांडे यांच्या समोर निभाव लागणार नाही हे लक्षात येताच ह्यूसन आणि बॉ निवासस्थानांच्या दिशेने पळून गेले.

छावणीतील सैनिकांनी बंड केल्याची वार्ता समजताच काही वेळानंतर कर्नल व्हीलर घटनास्थळी पोहचला. त्यानेही पलटणीतील सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याचा आदेश दिला. मात्र, या आदेशाला सैनिकांनी पायदळी तुडवत तीव्र विरोध प्रदर्शित केला. सैनिकांच्या असंतोषापुढे कर्नल व्हीलरही घाबरला आणि माघारी फिरला. याच दरम्यान, जनरल हिअर्सने गो-या शिपायांच्या मदतीने मंगल पांडे हल्ला केला. आता दुपार झाली होती. मंगल पांडेचे शरीर थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पाहताच त्यांनी बंदूकीने स्वत:वर गोळी झाडली. मंगल पांडे जमिनीवर कोसळले. शुद्ध हरपलेल्या जखमी मंगल पांडेंना गो-या सैनिकांनी उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून आठवड्याभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात खटला चालवण्यात आला. न्ययालयातील सुनावणीवेळी मंगल पांडे यांना कटातील इतर सैनिकांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांनी एकाचेही नाव सांगितले नाही. अखेर पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

बराकपूरमध्ये मंगल पांडे यांना फाशी देण्यासाठी जल्लाद मिळाला नाही तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कलकत्त्याहून चार जल्लादांना बोलावले. ही बातमी मिळताच अनेक छावण्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध असंतोष पसरला. हे लक्षात घेऊन ८ एप्रिल १८५७ रोजी सकाळी त्यांना फाशी देण्यात आली. इतिहासकार किम ए. वॅग्नर यांच्या ‘द ग्रेट फिअर ऑफ १८५७ – अफवा, षड्यंत्र आणि भारतीय उठावाची निर्मिती’ (the great fear of 1857 rumours conspiracies and the making of the indian uprising) या पुस्तकात बराकपूर येथे ब्रिटीश अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यापासून मंगल पांडेच्या फाशीपर्यंतच्या अनेक घटनांचे वर्णन केले आहे.

ब्रिटीश इतिहासकार रोझी लिलेवेलीन जोन्स यांच्या ‘द ग्रेट अपराईसिंग इन इंडिया, 1857-58 अनटोल्ड स्टोरीज, इंडियन अँड ब्रिटीश’ (The Great Uprising in India, 1857–58 – Untold Stories, Indian and British) या पुस्तकात असे म्हटले आहे की, २९ मार्चच्या संध्याकाळी बराकपूर येथे युरोपियन सैनिकांच्या आगमनाबाबत मंगल पांडे अस्वस्थ होते. त्यांना वाटले की ते भारतीय सैनिकांना मारण्यासाठी ते येत आहेत. यानंतर त्याने आपल्या सहकारी सैनिकांना चिथावणी दिली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

ही गोष्ट वनव्यासारखी पसरली आणि मंगल पांडेवरील अत्याचाराचा देशभरात विरोध केला गेला. या आंदोलनातून देशाचा स्वातंत्र्यलढा उभा राहिला, ज्याचा बिगुल मंगल पांडे यांनी फुंकला होता. मात्र, त्या घटनेनंतरही आपल्याला स्वातंत्र्य मिळायला जवळपास १०० वर्षे लागली. मंगल पांडे यांच्यानंतर २१ एप्रिल रोजी ईश्वरी प्रसाद यांनाही फाशी देण्यात आली. या बंडाच्या खुणा पुसण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी ३४ वी पलटणच बंद केली.

हेही वाचा : 

Back to top button