उसाच्या एफआरपी दरात क्विंटलमागे १५ रुपयांची वाढ; १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी मिळणार ३०५ रुपये दर | पुढारी

उसाच्या एफआरपी दरात क्विंटलमागे १५ रुपयांची वाढ; १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी मिळणार ३०५ रुपये दर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उसाच्या एफआरपी दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या (सीसीईए) बुधवारी (दि. ३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने प्रति क्विंंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी निश्चित केला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक एफआरपी दर आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या ऊस-साखर वर्षासाठी हा एफआरपी दर दिला जाईल. गेल्या आठ वर्षात एफआरपी दरात 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. एफआरपी दरात यंदा क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ झालेली आहे. मूळ रिकव्हरी दर 10.25 टक्के गृहीत धरून क्विंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी दर दिला जाणार असून प्रत्येक वाढीव 0.1 टक्के रिकव्हरीमागे 3.05 रुपये इतका प्रीमियम अर्थात दरवाढ दिली जाईल. हेच सूत्र मूळ रिकव्हरी दरापेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या उसासाठी वापरले जाईल.

साडेनऊ पेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या क्षेत्रातील उसासाठी हे सूत्र लागू असणार नाही. याठिकाणी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 282.12 रुपये या दराने एफआरपी दिला जाईल. चालू साखर वर्षात हा दर 275.50 रुपये इतका आहे. पुढील साखर वर्षासाठी ऊस उत्पादनाचा क्विंटलमागचा खर्च 162 रुपये इतका गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान 10 लाख टन साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून याबाबतची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button