Apps Blocked : अवैधरित्या माहिती हस्तांतरीत करणारे ३४८ अॅप्स ब्लॉक | पुढारी

Apps Blocked : अवैधरित्या माहिती हस्तांतरीत करणारे ३४८ अॅप्स ब्लॉक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने आतापर्यंत ३४८ मोबाईल  अॅप्लिकेशन ब्लॉक केले आहेत. नागरिकांची माहिती गोळा करणे, त्यांची प्रोफायलिंग करणे आणि अवैध मार्गाने ती बाहेरच्या देशातील संस्थांना पुरवण्याचा ठपका या अॅप्लिकेशन्सवर ठेवण्यात आला आहे. चीन तसेच इतर देशांच्या अॅपचाही त्यात समावेश असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत दिली. ही ३४८ मोबाईल अप्स यूजर्सकडून अवैध मार्गाने माहिती गोळा करीत होती. त्यांचे प्रोफायलिंग करणे तसेच अवैध मार्गाने बाहेरच्या देशात असलेल्या सर्व्हर्सकडे ही माहिती हस्तांतरित करीत होते. त्यामुळे केंद्र सरकारने ती ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चंद्रशेखर यांनी लोकसभेत बोलतांना दिली. (Apps blocked)

अशा प्रकारे देशातील नागरिकांची माहिती बाहेरच्या देशात अवैधपणे हस्तांतरित करणे हे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोकादायक ठरू शकते, तसेच देशाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या अॅप्सवर बंदी घालावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. या विनंतीची दखल घेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या या अॅप्सपैकी काही अॅप्स हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत, अशी माहितीही केंद्र सरकारने दिली आहे. (Apps blocked)

काही दिवसांपूर्वीच बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया या साऊथ कोरियाच्या क्रॉफ्टन या कंपनीने तयार केलेल्या प्रसिद्ध अॅपवर गुगलने बंदी घातली होती. केंद्र सरकारने आपल्याला तसे निर्देश दिले असल्याचे गुगलने सांगितले  होते. आता त्यानंतर अशाच प्रकारच्या ३४८ अॅप्सवर बंदी घातली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये क्रॉफ्टन कंपनीच्या आणि चीनच्या संबंधित ११७ अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, १४ फेब्रुवारी २०२२ रोजी चीनच्या संबंधित ५३ अप्सवर देशात बंदी घालण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ (अ) अन्वये सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली होती. (Apps blocked)

हेही वाचलतं का?

Back to top button