Ryan Burl : 6,6,6,6,4,6… रायन बुर्लने एकाच षटकात ठोकल्या 34 धावा! | पुढारी

Ryan Burl : 6,6,6,6,4,6... रायन बुर्लने एकाच षटकात ठोकल्या 34 धावा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तिसर्‍या T20 सामन्यात प्रेक्षकांना क्वचितच अपेक्षित असलेले दृश्य पाहायला मिळाले. या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बुर्ल याने बांगलादेशचा गोलंदाज नसूम अहमदच्या एका षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावत 34 धावा फटकावल्या. यासोबतच टी-20 सामन्यातील एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा त्याने संयुक्त विक्रम बनला आहे.

झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बुर्ल याने बांगलादेश विरुद्ध वादळी खेळी करत भारताचा माजी फलंडाज युवराज सिंगची आठवण करून दिली. 28 वर्षीय बुर्लने बांगलादेशच्या नसूम अहमदच्या एका षटकात 34 धावा फटकावल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा एका षटकात सर्व चेंडूंवर सीमापार गेले. याआधी युवराज सिंगने इंग्लंडच्या ब्रॉडला आणि विंडीजच्या पोलार्डने यांनी श्रीलंकन गोलंदाज धनंजयच्या एकाच षटकात सर्व चेंडू सीमापार घालवत 36 धावा वसूल केल्या होत्या.

बुरलेच्या स्फोटक खेळीमुळे झिम्बाब्वेने तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 10 धावांनी पराभव केला. एका वेळी झिम्बाब्वेची अवस्था 13 षटकांत 6 बाद 67 धावा अशी झाली होती. यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही असाच अंदाज बांधला जात होता. पण, बुर्ल याने 15 व्या षटकात 34 धावा फटकावत संघाची धावसंख्या 156 वर पोहचवली. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकांत केवळ 146 धावाच करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला.

नसीम हा T20 तील चौथा सर्वात महागडा गोलंदाज

टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील नसीम हा चौथा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. नसूम अहमद, ज्याने 34 धावा खर्च केल्या, तो भारतीय अष्टपैलू शिवम दुबे सोबत टी-20 आंतरराष्ट्रीय षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. दुबेने 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाचव्या T20 दरम्यान एका षटकात 34 धावा खर्च केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये, दोन गोलंदाज एका षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. युवराज सिंगने 2007 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारून 36 धावा वसूल केल्या होत्या. यानंतर किरॉन पोलार्डने 2021 मध्ये श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयाविरुद्ध एका षटकात सहा षटकार ठोकले होते.

Back to top button