पिंपरी : अधिकार्यांचे नव्याने कामकाज वाटप
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकार्यांना नव्याने कामकाज वाटप करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने कार्यकारी अभियंता (स्था) संवर्गातील अधिकार्यांना विविध जबाबदार्या देण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्याकडे सध्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आहे.
नव्याने त्यांच्याकडे क क्षेत्रीय स्थापत्य विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. अनिल शिंदे यांच्याकडे सध्या क क्षेत्रीय स्थापत्य विभागाची जबाबदारी होती. आता ह क्षेत्रीय स्थापत्यची जबाबदारी देण्यात आली आहे. राजेंद्र राणे यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागाची जबाबदारी होती. नव्याने त्यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग देण्यात आला. तसेच राऊत महादेव, उपअभियंता (स्था) यांचेकडे कार्यकारी अभियंता (स्था) जलनि:सारण विभागाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार देण्यास मान्यता देत आहे. मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता (स्था) यांचेकडील ह क्षेत्रीय (स्थापत्य) विभागाकडील अतिरिक्त कामकाज निरस्त करण्यात येत आहे.