निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत, लोणावळा नगरपरिषदेत 13 पैकी 7 प्रभागांत 3 जागांसाठी सोडत | पुढारी

निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत, लोणावळा नगरपरिषदेत 13 पैकी 7 प्रभागांत 3 जागांसाठी सोडत

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि.28) रोजी काढण्यात येणार आहे. नगरपरिषद कार्यालयात चौथ्या मजल्यावरील खुल्या सभागृहात दुपारी 12 वाजता ही सोडत काढण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणासह होणार आहे. यासाठी समर्पित आयोगाच्या शिफारशी ग्राह्य धरण्यात येणार असून त्या नुसारच ओबीसींची सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे.

लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी नगरपरिषदेसाठी 13 प्रभाग आहेत. ओबीसींसाठी 10.2 टक्के इतके आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार एकूण 3 जागा ह्या आरक्षित केल्या जाणार आहे. यातील दोन जागा ह्या महिला ओबीसींसाठी तर एक जागा सर्वसाधारण ओबीसी साठी आरक्षित असण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिक मध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण दिले गेले होते, त्यामुळे 7 जागा ओबीसी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी एकूण नगरसेवक संख्या 2 ने वाढूनही ओबीसींसाठीच्या एकूण 4 जागा कमी झाल्या आहेत.

गुरुवारी 28 जुलै रोजी एससी (अनुसूचित जाती) आणि एसटी (अनुसूचित जमाती) साठी आरक्षित झालेले प्रभाग वगळून इतर 7 प्रभागासाठी चिठ्ठ्या टाकून त्यातील तीन प्रभाग आरक्षित केले जाणार आहे. याशिवाय या आरक्षण संबंधीत हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत.

Back to top button