मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले : चंद्रकांत पाटलांची खदखद | पुढारी

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले : चंद्रकांत पाटलांची खदखद

पनवेल: विक्रम बाबर :  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची खदखद आज (दि.२३) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत जगजाहीर झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सर्वांसमक्ष मनातील  खदखद व्यक्त करीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे दुःख झाल्याचे मान्य केले. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, अशी जाहीर कबुली देऊन टाकली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पनवेलमधील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके  नाट्यगृहात आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विविध  राजकीय ठराव मांडण्यात आले. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव होता. या ठरावावर भाषण करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित असलेले राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून राज्यातील पदाधिकारी अवाक झाले. काही पदाधिका-यांनी तर चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यामुळे कपाळावर हात मारून घेतला.

चंद्रकात पाटील काय म्हणाले

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा निर्णय आपल्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला. पण आपल्याला दुःख झाले. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मान्य केला. काही जण तर रडले.  पण ते दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो कारण आपल्याला पुढे जायचे आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.शिंदे सीएम होतील वाटले नव्हते राज्यात वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला आणि तो देवेंद्र फडणवीस यांनीही मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सँल्यूट केला पाहिजे असे आवाहन चंद्रकात पाटील यांनी केले तेव्हा  सभागृहातील भाजपचे सर्व प्रतिनिधी उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

  शेलार यांची सारवासारव व खुलासा

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर अखेर भाजपचे नेते आमदार अँड. आशिष शेलार यांना सारवासारव करण्याची वेळ आली. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत यावर खुलासा करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर भाजप कार्यकर्त्यांना बसलेल्या धक्क्याचे चंद्रकात पाटील यांनी विश्लेषण केले. कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ व्यक्त केला. ते चंद्रकांत पाटील यांचे मत नाही किंवा भाजपचेही मत नाही. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ आलाच कसा हा प्रश्न आहे. हा अंतर्गत प्रश्न आहे. आणि तो आम्ही सोडवू असा खुलासा आशिष शेलार यांनी केला.

व्हिडीओ डिलीट झाला

प्रदेश कार्यकारिणीत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ काही क्षणात व्हायरल होण्यास सुरवात झाली. पण प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य भाजपच्याच अंगाशी आल्यामुळे  भाजपच्या फेसबुक पेजवरून काही मिनिटातच हा व्हिडीओ डिटिल झाला. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचेच भाषण फेसबुक पेजवरून डिलिट करण्याची वेळ भाजपवर आली

हेही वाचलंत का ? 

Back to top button