शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातून साकारलेल्या जेम पोर्टल, ई- मार्केट प्लेस हे महिलांना उद्योजक जगामध्ये पाऊल ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून महिलांना उद्योजक बनण्याची संधी असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा संघटन सरचिटणीस वंदनाताई राजेंद्र गोंदकर यांनी केले.
नगर जिल्ह्यातील पहिलेच शिबिराचे आयोजन शिर्डी येथे करण्यात आले होते. या पोर्टलबद्दल शिर्डीतील महिलांना सविस्तर माहिती मिळावी व त्यांनाही उद्योजक होता यावे, यासाठी भाजप महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा संघटन सरचिटणीस वंदनाताई गोंदकर यांनी शिर्डी येथे जेम पोर्टल, ई- मार्केट प्लेसचे शिबिराचे आयोजन केले. देशभरातील अनेक महिलांनी नावीन्यपूर्ण बनवलेल्या वस्तू या पोर्टलद्वारे विकत आहेत. विविध वस्तूंना राष्ट्रीय बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
यावेळी जेम पोर्टलच्या राष्ट्रीय प्रभारी उषाताई वाजपाई यांनी उपस्थित महिलांना अतिशय उपयुक्त व सविस्तर माहिती सांगितली. या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यापासून ते आपण बनवलेली वस्तू विकून तिचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होण्यापर्यंतचे सर्व मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच शिशु मुद्रा लोनच्या माध्यमातून भांडवल उभा करून या वस्तू बनवण्यासाठीचे काम करू शकता, असेही त्यांनी सांगितले. तसेच सोनाली मोडक सारापल्ली यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशसह संयोजक मुकुंद वर्मा व कविता थोरात यांसह 200 हून अधिक महिला शिबिरास उपस्थित होत्या.