चंद्रपूर : वर्धा नदिच्या पुरात अडकलेल्या मजुरांना बचावण्यात यश | पुढारी

चंद्रपूर : वर्धा नदिच्या पुरात अडकलेल्या मजुरांना बचावण्यात यश

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षभरापासून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर कोलगाव वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम निर्माणाधीन आहे, त्या ठिकाणी 6 मजूर सामानाची देखभाल करण्यासाठी थांबले होते. बुधवारी अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढला, त्यामुळे त्या मजुरांनी जीव वाचविण्यासाठी जवळच असलेल्या विसापूर गावाकडे धाव घेतली. परंतु पुरामुळे विसापूरकडे येण्याचा मार्ग देखील बंद होता. अखेर त्या मजुरांना बुधवारची रात्र जीव मुठीत घेऊन शेतशिवारातील एका पडक्या झोपडीत काढावी लागली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्या सहाही मजुरांना पुरातून बाहेर काढून जीव वाचविला. हे रेस्क्यू मिशन आज, गुरूवारी (दि.१४ जुलै) सकाळी सातच्या सुमारास करण्यात आले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर कोलगाव मार्गावर वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम निर्माणाधीन आहे. पुलाच्या बांधकामाकरिता साहित्य ठेवण्यात आले आहे. सदर साहित्याची देखरेख करण्यासाठी सहा मजूर त्यामध्ये विनोद पिंपळशेंडे, प्रल्हाद बारस्कार, बाबुराव मेश्राम, प्रकाश केवट, सुजान केवट व सुखीलाल केवट हे कार्यरत होते. बुधवारी (दि.१३ जुलै) अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढला. त्यामुळे त्या मजुरांनी जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या विसापूर गावाकडे धाव घेतली. परंतु, पुरामुळे विसापूरकडे येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेर त्या मजुरांना बुधवारची रात्र जीव मुठीत घेऊन शेतामध्ये एका पडक्या झोपडीत काढावी लागली. सभोवती पाणी वाढत होते. मात्र जीव मुठीत धरून त्यांनी भया अवस्थेत बुधवारची रात्र काढली. पूर वाढत असल्याने आणि सभोवती पाणी असल्याने त्यांना बाहेर निघता येणे शक्य नव्हते. जवळ कुणी आढळूनही आले नाही. त्यामुळे आपण पुरात अडकल्याची माहिती जवळच्या गावकऱ्यांना व्हावी याकरीता त्यांची धडपड सुरू होती.

दरम्यान त्यापैकी एकाकडे मोबाईल असल्याने त्याने आम्ही सहा मजूर पुरात अडकून असल्याची माहिती रात्री ८ वाजता विसापूर येथे दिली. लगेच बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थिती जाणून घेतली. पुरात अडकलेल्या सहाही मजुरांना ग्रामपंचायतच्या जुन्या पडक्या घरात आसरा घेण्याची मोबाईल वरून सूचना केली. सदर घटनेची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी (पाटील), तहसीलदार संजय राईचंवार यांना विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी दिली. मात्र बुधवारी रात्र झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्या सहाही जणांनी बेट स्वरूपात असलेल्या ठिकाणी काळोखात रात्र काढावी लागली. वाढणाऱ्या पुराने सहाही मजूर भयभीत झाले होते.

आज गुरूवारचा दिवस उजाडला. सकाळी ६ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्या मजुरांचे रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळाकडे कूच केली. त्यानंतर मजुरांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. शेतातील त्या झोपडीकडे बोटीने जाण्यासाठी निघाले. घटनास्थळापासून दूरपर्यंत काहीच समजत नव्हते. अखेर जवळ गेल्यानंतर त्यांचे लोकेशन समजले. जीवाच्या आकांताने सहाही मजूर घाबरलेले होते. त्या मजुरांसाठी ही रात्र काळरात्र ठरते की काय? अशी अवस्था त्या मजुरांची झाली होती. आपत्तीव्यवस्थापनाचे चमू दिसताच त्यांच्या जिवात जीव आल. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले.

पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात, विसापूरचे माजी सरपंच बंडू गिरडकर यांच्या मदतीने सहाही मजुरांना पुरातून बाहेर काढण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख विजय बुंगले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महत्वपूर्ण कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

Back to top button