‘NEET UG’ परीक्षा स्थगित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार | पुढारी

'NEET UG' परीक्षा स्थगित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी १७ जुलैला आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ स्थगित करण्यास गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. याचिका सुनावणी योग्य नसून याचिकाकर्ते विद्यार्थी असल्याने त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली नाही. पंरतु,त्यांच्याऐवजी इतर कुणी अशाप्रकारची याचिका करण्यात आली असती तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असती, असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी याचिका फेटाळली.

भविष्यात अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आल्या तर दंडात्मक कारवाई करण्यास न्यायालय संकोच करणार नाही,अशा शब्दात न्यायमूर्तींनी याचिकर्त्यांना सुनावले. शेवटच्या क्षणी याचिका दाखल केल्याबद्दल न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांच्या वकीलाला  देखील खडसावले.

विविध कारणांमुळे विद्यार्थ्याकडून मागील काही महिन्यांपासून नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात होती.असंख्य विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र दीडशे ते तीनशे किलोमीटर इतके लांब आलेले आहे. शिवाय काही राज्यांमध्ये पुराने थैमान घातल्याने विद्यार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर पोहोचतील काय, यासंबंधी साशंकता निर्माण झाली आहे.

ही परीक्षा स्थगित करावी अथवा ती दोन टप्प्यात घेतली जावी, असा युक्तिवाद अँड.ममता शर्मा यांच्यावतीने बुधवारी करण्यात आला होता. परिक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळलेला नसल्याने परीक्षा पुढे ढकलली जावी, अशीही मागणी काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.परंतु न्यायालयाने याचिका फेटाळल्याने परीक्षा १७ जुलै रोजीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button