अक्कलकोट : टायरअभावी एस.टी.चे 16 लाखांचे नुकसान | पुढारी

अक्कलकोट : टायरअभावी एस.टी.चे 16 लाखांचे नुकसान

हंजगी : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण महाराष्ट्रातील आणि बहुतांश शहरातील नागरिकांसाठी एस.टी. बस ‘लालपरी’ ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी, मजूर आणि वयोवृद्धांसाठी एस.टी. प्रवास आवडीचा असतो. मात्र अक्कलकोट एस.टी. आगारातील सहा एस.टी. बसेस टायरअभावी आगारात धूळखात पडून आहेत. यामुळे एका एस.टी.चे दररोज सहा हजार असे सहा एस.टी. बसचे दररोज 36 हजार, असे दीड महिन्यांतून सुमारे 16 लाख 20 हजार रुपये अक्कलकोट आगाराला तोटा होत असल्याची माहिती अक्कलकोट आगारप्रमुख रमेश मंता यांनी सांगितले.
एस.टी. सेवा ही ग्रामीण भागासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत सार्वजनिक प्रवासी बस वाहतूक सेवा अहोरात्र पुरविण्यात येते. अक्कलकोट तालुक्यातील एस.टी. बसगाड्यांची अवस्था मात्र अतिशय दयनीय झाली आहे. अनेक एस.टी. बसेस टायर व मेंटेनन्स नसल्याने धूळखात आगारातच पडून राहिले आहेत. त्यातच अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांची अवस्था ही बिकट झाल्याने वारंवार एस.टी.चे टायर खराब होणे, पंक्चर होण्याचे संकट अक्कलकोट एस.टी. महामंडळासमोर उभे आहे. यामुळे तालुक्यातील प्रवाशांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अक्कलकोट आगारात एकूण 70 बसगाड्या असून सध्या त्यामध्ये सहा एस.टी. बसगाड्या टायर नसल्याने आगारातच पडून राहिल्या आहेत. या सहा गाड्यांच्या फेर्‍या सध्या बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामस्थ व व्यापार्‍यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका बसची सहा हजार, तर दररोज सहा बसचे 36 हजार रुपये, असे दीड महिन्याचे 16 लाख वीस हजार रुपये अक्कलकोट आगाराला तोटा झाल्याचे रमेश मंता यांनी सांगितले. बसगाड्यांचे टायर खराब असल्याने दिवसाला अनेक बसगाड्या पंक्चर होताना दिसतात.
सध्या तालुक्यात अनेकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेकठिकाणी रस्त्यांची काम अर्धवट राहिले आहेत. अनेकठिकाणी रस्ते उखडले आहेत. या सर्वांचा फटका सध्या एस.टी. बसगाड्यांना बसत आहे. सध्या एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बसगाड्यांना वेळेवर टायर अथवा अन्य मेंटेनन्स होत नसल्याने बसगाड्या आगारातच पडून राहिल्याचे चित्र अक्कलकोट एस.टी. महामंडळात प.हायला मिळत आहे. अशी संकटे वारंवार महामंडळासमोर उभी ठाकत असल्याचे आगारप्रमुख रमेश मंता यांनी सांगितले. टायर व ट्यूब वेळेवरह मिळत नसल्याने जुन्याच टायरवर बसेस सोडल्या जातात. यामुळे बसेस पंक्चर होणे, बंद पडणे, असे वारंवार प्रकार घडत आहेत. इकडे चालक व वाहकांना मात्र प्रवाशांच्या रोषाला दररोज सामोरे जावे लागत आहे.
बसगाड्यांना वेळेवर टायरचा पुरवठा होत नसल्याने जुनेच टायर वापरावे लागत आहेत. काही टायर तर पूर्ण गुळगुळीत झाले आहेत. अशा गाड्यांची उन्हाळ्यात तर अधिकच समस्या निर्माण होत असल्याचे आगारप्रमुख रमेश मंता यांनी सांगितले. ‘नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणारी लालपरी दिवसेंदिवस आर्थिक अडचणीच्या खोल खाईत लोटली जात आहे. आजही एस.टी. महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सरकारने लक्ष घालून उपाययोजना केल्या तर एस.टी. महामंडळाला आर्थिक संकटातून उभारी मिळण्यास मदत होईल. मात्र प्रलंबित प्रश्‍न आणि भविष्य लक्षात घेता एस.टी.चे भवितव्य मात्र अंधकारमय असल्याचे बोलले जात आहे.

सध्या बस डेपोत टायरअभावी काही बसेस थांबून आहेत. यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. टायर उपलब्ध झाल्यास एस.टी. बस पूर्ववत करण्यात येईल.
– रमेश मंता
आगारप्रमुख, अक्‍कलकोट

सध्या एस.टी. बस बंद असल्याने खासगी बसने जीव मुठीत धरून प्रवास करीत कॉलेजला जावे लागत आहे.वेळेवर कॉलेजला पोहोचत नसल्याने माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
– राजश्री बिराजदार, विद्यार्थिनी

यासंदर्भात जिल्हा आगारप्रमुख यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. टायर व बॅटर्‍या उपलब्ध झाल्यावर प्रथम प्राधान्य अक्‍कलकोट तालुक्याला देण्यात येणार आहे. त्यामुळे होणारी गैरसोयी लवकरच दूर करू.
– सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्‍कलकोट

Back to top button