ओतूरच्या मुस्लिम बांधवांनी केला हिंदूंच्या एकादशीचा सन्मान; बकरी ईदची कुर्बानी रविवारऐवजी मंगळवारी | पुढारी

ओतूरच्या मुस्लिम बांधवांनी केला हिंदूंच्या एकादशीचा सन्मान; बकरी ईदची कुर्बानी रविवारऐवजी मंगळवारी

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: यंदा हिंदुधर्मीयांची पवित्र एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद येत्या रविवारी १० जुलै रोजी एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे ओतूरचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे आणि जगदंब प्रतिष्ठान यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओतूर शहरातील मुस्लिम बांधवांनी रविवारचा कुर्बानीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याऐवजी फक्त नमाजपठण करायचे आणि बकरी कुर्बानी कार्यक्रम मंगळवारी १२ जुलै रोजी करण्याचे ठरविले आहे. याबाबत ओतूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी हिंदूंच्या वतीने मुस्लिम बांधवांचा सन्मान करण्यात येऊन मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अत्यंत आदरपूर्वक व पावित्र्य राखून हिंदुधर्मीयांच्या एकादशीला मुस्लिम बांधवांकडून मिळालेला हा सन्मान आदर्शवत असून, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे हाजी चाँद मोमीन, रशीद मोमीन, शकील तांबोळी, रज्जाक इनामदार, रईस मणियार, सलीम मणियार, शौकत शेख, शाही मस्जिदचे मौलाना सिद्दिकी साहेब, पापा मोमीन, शक्ती मोमीन, सिकंदर तांबोळी, सलमान तांबोळी, फय्याज इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button