टीम इंडियाला धक्का! राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक नसणार, कारण… | पुढारी

टीम इंडियाला धक्का! राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक नसणार, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीनंतर 3 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 7 जुलैला होणार आहे. याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. राहुल द्रविड हे पहिल्या टी 20 सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणून नसतील आणि त्यांच्या जागी VVS लक्ष्मण हे पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असतील.

भारत-इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन येथे सुरू असलेला कसोटी सामना 5 जुलै रोजी संपेल. त्यानंतर दोन दिवसांनी भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 खेळला जाणार आहे. एजबॅस्टन कसोटी खेळणारे विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह पहिला टी-20 खेळणार नाहीत. यासोबतच द्रविडही मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत नसतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण हे द्रविड यांच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

गेल्या महिन्यात भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता. त्याच वेळी, दुसऱ्या संघाने दोन टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली. त्या दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात आयर्लंड मालिकेत खेळलेल्या बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या मालिकेसाठी सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. सोबतच संघाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणही इंग्लंडला पोहचले आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. या मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित कोरोनामधून बरा झाला असून त्याने सराव सुरू केला आहे.

भारत-इंग्लंड पहिला T20 7 जुलै रोजी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T 20 सामना 7 जुलै रोजी, दुसरा सामना 9 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये आणि तिसरा सामना 10 जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये खेळवला जाईल. यानंतर 12 जुलैपासून दोन्ही देशांमधील वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ओव्हलवर होणार आहे. दुसरा सामना 14 जुलैला लॉर्ड्सवर आणि तिसरा सामना 17 जुलैला मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.

Back to top button