परत फिरा रे...! उद्धव ठाकरेंची हाक
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही परत या, माझ्यासमोर बसा, यातून निश्चित मार्ग निघेल’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा हाक दिली.
शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला. आपण मार्ग काढू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुवाहटी मुक्कामी असलेल्या बंडखोरांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीमध्ये अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, माझे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या. माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल.
आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एका बाजूने आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नात्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहिल, मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा, तर दुसर्या बाजूला मात्र हिंदुत्वविरोधी ‘मविआ’ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?
– एकनाथ शिंदे, शिवसेना बंडखोर गटाचे नेते