संत सोपानदेवांच्या पालखीचे आषाढीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

संत सोपानदेवांच्या पालखीचे आषाढीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान

नारायणपूर, पुढारी वृत्तसेवा: सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव महाराजांच्या सोहळ्याने शनिवारी २५ जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी हजारो वारकऱ्यांनी सासवडच्या संजीवन समाधी स्थळावर व देऊळवाड्याभोवती गर्दी केली होती. दुपारी १२:३० वाजता संत सोपानदेवांच्या पालखीची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन उत्तरेकडील दरवाजातुन हा सोहळा बाहेर पडला. यावेळी हजारो भाविकांनी माउली व सोपानदेवांचा जयघोष केला. सासवडकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. त्याप्रसंगी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. टाळ-मृदगांच्या गजरात ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात भगव्या पताकाकच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधु संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे आषाढीसाठी सासवडवरुन उत्साही वातावरणात पांगारे गावाकडे प्रस्थान झाले.

दरम्यान शनिवार बारस व सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थानदिन असल्याने मंदिरात पहाटे ४ वाजता काकडआरती, महापूजा व धार्मिक विधी झाला. त्यानंतर पहाटे ५ वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. संत सोपानदेवांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी ११:३० वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्याना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंड्या प्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याच दरम्यान देवस्थानचे प्रमुख डॉ. गोपाळ गोसावी महाराज यांनी देव घरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणा मंडपातील पालखीमध्ये विधीवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट व सासवड नगरपालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत सोपानकाकांची प्रतिमा, श्रीफळ व महावस्त्र देण्यात आले.

संत सोपानदेवांच्या पालखी प्रस्थान दुपारी १:३० झाले. या सोहळ्याप्रसंगी मंदिरात आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गट विकास अधिकारी अमर माने, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप, विजय वढणे, माजी नगरसेवक सुहास लांडगे, संदीप जगताप, मनोहर जगताप, अजित जगताप तसेच पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणच्या देवस्थानचे प्रतिनिधी व दिंडी प्रमुख, सासवडचे सर्व माजी नगरसेवक व माजी नगरसेविका, ग्रामस्थ व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

जेजुरी नाक्यावर आमदार संजय जगताप आणि अन्य पदाधिकारी यांनी दिंडी प्रमुख, विणेकरी, चोपदार, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना नारळ व गुलाबपुष्प देऊन निरोप दिला. यावेळी हजारो सासवडकर नागरिक उपस्थित होते. पालखी सोबत ९० दिंड्या आहेत. रथासाठी हिरा आणि सुंदर या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान असून नितीन कुलकर्णी यांचे नगारावाहन आहे. स्व. चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ देवस्थानला अर्पण केलेल्या अश्वासह हिरा आणि सुंदर पालखी समवेत मार्गक्रमण करीत आहे. दुपारी २.४५ च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर ग्रामस्थ आणि हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.

सोपानकाका पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पांगारे (ता. पुरंदर) गावात होणार आहे. हा सोहळा परींचे मार्गे मांडकी, निंबूत, सोमेश्वरनगर, कोराळे, बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, बोंबले, भंडी शेगाव, वाखरी असे मुक्काम करीत पंढरपूरला पोहचणार आहे

Back to top button