पिंपरी : पालखी सोहळ्यात चोर्‍या करणार्‍या बारा जणांना अटक | पुढारी

पिंपरी : पालखी सोहळ्यात चोर्‍या करणार्‍या बारा जणांना अटक

पिंपरी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चोर्‍या करणार्‍या बारा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (दि. 21) देहूगाव, चिंचोली येथे ही कारवाई करण्यात आली. सुनील दत्तू म्हस्के (वय 25), विलास हिरामण धोत्रे (वय 25), संतोष सहदेव म्हासळकर (वय 26), नागेश बारकू पवार (सर्व रा. पाथर्डी, जि. अहमदनगर), महिला (वय 35, रा. नांदेड), रामकृष्ण बबन जाधव, बाळू तुळशीराम जाधव, रामेश्वर आंबादास जाधव, माणिक दौलतराव जाधव (सर्व रा. बीड), महिला (45, रा. म्हेत्रे गार्डन, चिखली), रतन दादा घनवट (25, रा. साने चौक, चिखली), महिला (35, रा. नांदेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील मुख्य कमानीजवळ 30 वर्षीय महिला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत होत्या. त्यावेळी एका महिलेसह पाच जणांनी त्यांना घेरले. त्यांच्या गळ्यातील 72 हजार 975 रुपयांचे गंठण काढून घेतले. तसेच, ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुशांत विष्णू सूर्यवंशी (31, रा. परंडवाल चौक, देहूगाव) हे चिंचोली येथील मोकळ्या मैदानात शनी मंदिराच्या बाजूला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. तिथे आलेल्या पाच जणांनी सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 60 हजारांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. वरील दोन प्रकरणांमध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

चिंचोली येथे शनी मंदिराजवळ दर्शनासाठी थांबलेल्या 46 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 73 हजार 96 रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे छोटे गंठण चौघांनी हिसकावून घेतले. त्यावेळी नागरिकांनी चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, गणेश दिनकर टिळेकर (33, रा. देहूगाव) यांच्या खिशातून 53 हजार 500 रुपये रोख रक्कम काढून चोरटे पळाले. तसेच, चिंचोली येथे एका महिलेच्या गळ्यातील 30 हजारांचे छोटे गंठण देखील हिसका मारून चोरून नेले. वरील तीन प्रकरणांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण 13 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button