राजकीय उलथापालथ : रत्नागिरीचे चारही आमदार शिवसेनेसोबतच | पुढारी

राजकीय उलथापालथ : रत्नागिरीचे चारही आमदार शिवसेनेसोबतच

रत्नागिरी : राजेश चव्हाण; शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत २९ आमदारांच्या नाराजी नाट्यामुळे मविआ सरकार धोक्यात आले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सेनेसोबत आहेत. रत्नागिरीतील शिवसेना अभेद्य असून, आमची निष्ठा ही शिवसेनेवर असल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. कोणत्याही आमिषाला जिल्ह्यातील आमदार बळी पडणार नसल्याच्या प्रतिक्रिया संपर्क झालेल्या आमदारांनी दिल्या आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मविआची मते फुटल्यावरुन कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळपासून शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल होते. त्यांच्यासोबत जवळपास २९ शिवसेना आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळीपासूनच प्रसारमाध्यमातून येणार्‍या वृत्तामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सध्या कोठे आहेत, याची चर्चा रंगताना दिसत होती.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते अनिल परब आणि अन्य नेते मंडळींचे खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यातील डावलाडावलीच्या राजकारणामुळे योगेश कदम यांच्याविषयी विशेष चर्चा रंगली होती. योगेश कदम यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आपण शिवसेनेसोबत असून, आपल्या रक्‍तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले.

गुहागरचे शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनीही आपण चिपळुणात असून, शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला वरिष्ठांशी संपर्क झाला असून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच जी जबाबदारी खांद्यावर देतील ती पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले.

राजापूर-लांजाचे आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर ने पुन्हा मुंबईला रवाना झाले. आ. साळवी यांच्या संपर्क साधला असता, आपण स्व. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझी निष्ठा ही बाळासाहेबांच्या पायाशी आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय आपण कधी विचारही करणार नाही. आपण मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर काही आमदारांसोबत जात असल्याचे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य असून एकही आमदार फुटणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शिवसेनेचे तरुण आमदार व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीत मंगळवारी नियोजित दौरा होता. परंतु सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर ते मुंबईतच तळ ठोकून आहेत.

हेही वाचा :

Back to top button