युक्रेनी महिलांची होरपळ | पुढारी

युक्रेनी महिलांची होरपळ

कोणत्याही युद्धाचे परिणाम दूरगामी असतात. ते राजनैतिक, सामरिक आणि आर्थिक असतात, तसेच सामाजिक व कौटुंबिकही असतात. एक कोटींहून अधिक लोक युक्रेनमधून स्थलांतरित आहेत. रशियन सैनिकांंकडून युक्रेनी महिला व बालकांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांचे प्रमाणही अधिक आहे.

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेन हा देश उद्ध्वस्त झाला आहे. विशेषतः तेथे असलेल्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीनुसार, तेथे 400 मृतदेह कचर्‍याच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले होते. या युद्धाच्या भीतीमुळे हजारो-लाखो युक्रेनवासीयांना मायदेश सोडून पलायन करावे लागत आहे आणि अन्य देशांमध्ये निर्वासित म्हणून आयुष्य जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पोलंड, हंगेरी, रुमानिया या युक्रेनच्या पश्‍चिमी सीमेकडील देशांमध्ये हे सर्व युक्रेनवासीय निवार्‍याच्या, आश्रयाच्या शोधात धाव घेत आहेत. आयुष्यभराच्या कमाईतून उभे राहिलेले आपले हक्‍काचे घर, कुटुंब, संसार, भौतिक सोयीसुविधा या सर्वांच्या काळजीमुळे हे लोक प्रचंड तणावाखालचे आयुष्य जगत आहेत. युद्धझळांचा सामना करणार्‍यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक महिला आणि बालकांचा समावेश आहे. यामध्ये काही महिला गर्भवती आहेत, काही अपंग आहेत, काही हिंंसाचाराला बळी पडलेल्या आहेत.

संबंधित बातम्या

बस, कार, रेल्वे यासारख्या मिळेल त्या वाहनाने आजही युक्रेनचे नागरिक देश सोडून जात आहेत. तथापि, युक्रेन सरकारने म्हणजेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक फतवा काढून 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडता येणार नसून त्यांना लढाई लढावी लागेल, असा फतवा काढला होता. त्यामुळे महिला, वृद्ध पुरुष आणि बालकांवर आपल्या कुटुंबप्रमुखाविना आलेल्या संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

अर्थात, शेजारची राष्ट्रे युक्रेनवासीयांना पुरेपूर मदत करत आहेत. आज एक कोटींहून अधिक लोक युक्रेनमधून अन्य देशांमध्ये गेेले आहेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. महिला आणि बालकांचे लैंगिक शोषण केले जात असल्याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिला व बालकांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या विशेष दूत प्रमिला पॅटन त्यांच्या मते, युक्रेनमधील महिलांना बलात्कार, पीडित महिलांच्या मुलांचे लैंगिक शोषण अशा अनेक अमानवी कृत्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुळात अशा स्थितीमध्ये अत्याचारांबाबतची तक्रार देणार्‍या महिलांची संख्या कमी असते. कारण, त्यांच्या द‍ृष्टीने आपला जीव वाचवणे, मुलाबाळांचे, कुटुंबाचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे अशा घटनांचा नेमका आकडा हा कधीच समोर येणार नाही. प्रमिला पॅटन यांनी अशा महिलांना तक्रार करण्याचे आवाहन केले असून यामुळे संयुक्‍त राष्ट्रसंघाला एक सामूहिक अहवाल तयार करता येईल आणि त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडता येईल, असे म्हटले आहे.

युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यांनी एक अभ्यास केला होता आणि त्यात त्यांनी म्हटले होते की, 75 टक्के युक्रेनी महिलांवर कोणत्या कोणत्या प्रकारचा अत्याचार झाला आहे. अनेकदा बलात्काराचा वापर शत्रू राष्ट्रांकडून एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. युक्रेनच्या एका खासदारांनी मध्यंतरी असे म्हटले होते की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनी महिलांवर बलात्कार करून त्यांच्या अंगावर रशियाच्या स्वस्तिक आकाराच्या भाजलेल्या खुणांचे ठसे उमटवले आहेत.

अशा परिस्थितीमध्ये मानवी तस्करी करणारेही शिरजोर होतात, असे इतिहास सांगतो. असे तस्कर पीडित, गरजू महिलांना रेडलाईट एरियामध्ये वेश्या व्यवसायासाठी विकणे, बेकायदेशीर खाणीत बंधक कामगार म्हणून विकणे, घरगुती बंधक नोकर तयार करण्यासाठी विकणे असे अघोरी प्रकार करतात. इतकेच नव्हे, तर या महिला-मुलांच्या शरीराचे अवयव विकले जातात. कित्येकदा त्यांना भीक मागण्यास किंवा गुन्हा करण्यास भाग पाडले जाते. ही सर्व भीषण परिस्थिती पाहता रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबणे, त्यातून तत्काळ तोडगा निघणे गरजेचे आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन

Back to top button