राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपचे लक्ष्‍य आता मुंबई महापालिका : देवेंद्र फडणवीस | पुढारी

राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपचे लक्ष्‍य आता मुंबई महापालिका : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रूपात तिसरी जागा जिंकत महाविकास आघाडीला मोठा हादरा दिला आहे. या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे आता लक्ष्‍य स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीवर असणार हे स्पष्ट आहे.

मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षं शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई आणि मराठी माणूस आणि शिवसेना हे समीकरण बळकट असल्याने शिवसेनेसाठी मुंबई महापालिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेनेची बऱ्याच अंशी रसद ही मुंबई महापालिकेतून येत असल्याने मुंबई महापालिका जिंकून भाजपला शिवसेनेला मोठा धक्का द्यायचा आहे. भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.

फडणवीस यांनीही भाजपचे पुढील लक्ष्‍य हे मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे हेच असेल असे स्पष्ट केले आहे. “राज्यसभा निवडणूक ही फक्त सुरुवात आहे. मुंबई महापालिकेसह पुढील सर्व निवडणुका आम्हीच जिंकू. राज्यसभा निवडणुकांचा जो निकाल लागला, त्यावर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”

Back to top button